राऊतांचा प्रचार नाहीच; भाजपा पदाधिकारी ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:36 AM2019-03-12T04:36:36+5:302019-03-12T04:37:55+5:30
पक्ष कारवाई झाली तरी बेहत्तर; पण राऊतांचा प्रचार करणार नाही, अशी रोखठोक भूमिका भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
कणकवली (सिंधुदुर्ग) : मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीमुळे शिवसेनेचे विनायक राऊत खासदार झाले. मात्र त्यांनी गेल्या पाच वर्षात विकासकामांमध्ये भाजपाला सापत्नपणाची वागणूक देताना पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांना कधीही विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे आपल्यावर पक्ष कारवाई झाली तरी बेहत्तर; पण राऊतांचा प्रचार करणार नाही, अशी रोखठोक भूमिका भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी आमदार प्रसाद लाड, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री चव्हाण यांच्यासमोर आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला आपल्याला विजयी करायचे आहे, असे सांगत मंत्री चव्हाण यांनी युतीचा धर्म पाळण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले.