जिल्हा परिषद पद भरतीत कोणताही घोटाळा नाही
By admin | Published: December 15, 2015 10:41 PM2015-12-15T22:41:34+5:302015-12-15T23:31:25+5:30
शेखर सिंह यांचे स्पष्टीकरण : वैद्यकीय चाचणीनंतरच अंतिम उमेदवार यादी
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत कोणताही घोटाळा झाला नसल्याचा स्पष्ट निर्वाळा मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिला. या भरतीतील सर्व उमेदवारांचे गुण बुधवारी जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच वैद्यकीय चाचणी झाल्यानंतरच अंतिम उमेदवार निवड यादी जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषदेतील विविध ६९ पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर उमेदवारांच्या अंतरिम निवड याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यातील परिचर संवर्गाच्या यादीमध्ये बदल करून ती नव्याने लावण्यात आल्यामुळे ही भरती संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यातच समांतर आरक्षणाअन्वये उमेदवारांची अंतरिम निवडसूची लावण्यात आल्यामुळेही संभ्रमावस्था निर्माण झाली होती. या संदर्भात शेखर सिंह यांची भेट घेतली असता त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. एकूणच या भरती प्रक्रियेसंदर्भात बोलताना शेखर सिंह यांनी ही प्रक्रिया कशी राबविली गेली याची संक्षिप्त माहिती दिली. परिचर संवर्गातील अंतरिम यादी जेव्हा जाहीर करण्यात आली त्याचवेळी २०१४ मध्ये निघालेल्या समांतर आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाचा अवलंब करण्याचे राहून गेले होते. त्यामुळे तांत्रिक बाब म्हणून ही यादी बदलावी लागली. मुळात या शासन निर्णयातील निर्देशदेखील संदिग्ध असल्यामुळे आपण ग्रामविकास मंत्रालयाशीसुद्धा संपर्क साधला. दरम्यान २००७ मध्ये राजस्थानमधील एका प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाने समांतर आरक्षणासंदर्भात दिलेल्या कायदेशीर व स्पष्ट अशा निर्देशानुसार अवलंब करून या अंतरिम यादीमध्ये बदल करण्यात आले व समांतर आरक्षणाचा फायदा संबंधित उमेदवाराला मिळाला. यामध्ये प्रथम निवड सूचित जाहिर झालेल्या उमेदवाराच्या नावामुळे ‘त्या’ उमेदवाराला आपण निवडलो गेल्याचे समाधान झाले व दुसऱ्याच यादीत ती थेट प्रतिक्षा यादीवर गेल्याचे समजल्यावर तिचा विरस होणे स्वाभाविक आहे हे मी मान्य करतो. मात्र समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी केली नसती तर कदाचित काही उमेदवारांवर अन्याय झाला असता. या भरतीतदेखील जोपर्यंत कागदपत्रांची छाननी व वैद्यकीय चाचणी होत नाही तोपर्यंत अंतिम यादी जाहिर होणार नाही. या परीक्षेचे पेपर आपण स्वत: २४ तास डोळ्यात तेल घालून काढले असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
युवासेनेचा आंदोलनाचा इशारा
विविध पदांसाठी जिल्हापरीषदेच्या वतीने घेण्यात आलेली भरती प्रकिया संशय निर्माण करणारी आहे. त्या मुळे या भरती प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देवून पारदर्शक पध्दतीने भरती प्रक्रिया घेण्यात यावी. अन्यथा युवा सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांना दिला आहे. आज युवा सेनेच्या शिष्ठमंडळाने जिल्ह्याचे मुख्य कार्यकार अधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख शेखर गावडे, तानाजी पालव, संकेत सावंत, श्रीकृष्ण कदम, योगेश तावडे, शेखर परब, निर्नाश महाडेश्वर, प्रणव वर्दम, प्रसाद पालव, गंगाराम पालव, नवरत्न पालव आदी उपस्थित होते.