तहसीलदारांच्या कारवाईत पारदर्शकता नाही, मंदार केणी यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 04:02 PM2019-01-24T16:02:05+5:302019-01-24T16:10:53+5:30
महसूलकडून हप्तेबाजीसाठी कारवाईचे नाटक केले जात आहे. तहसीलदार करत असलेल्या कारवाईत पारदर्शकता नाही. वाळू व्यावसायिकांना वेठीस धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचले असल्याचा धक्कादायक आरोप करताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी हडीत वाळू व्यावसायिकांकडून तहसीलदारांना मारण्याचा प्रयत्न झाला नसल्याचा दावा केला आहे.
मालवण : महसूलकडून हप्तेबाजीसाठी कारवाईचे नाटक केले जात आहे. तहसीलदार करत असलेल्या कारवाईत पारदर्शकता नाही. वाळू व्यावसायिकांना वेठीस धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचले असल्याचा धक्कादायक आरोप करताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी हडीत वाळू व्यावसायिकांकडून तहसीलदारांना मारण्याचा प्रयत्न झाला नसल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, तहसीलदार खोट्या केसीस दाखल करून वाळू व्यावसायिकांना अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. हप्ते देणाऱ्यांवर कारवाई होत नाही. कमी हप्ते देणाऱ्यांवर कारवाईसाठी ठराविकच कर्मचारी घेऊन तहसीलदार पोहचत आहेत. तथाकथित घटना बनाव असल्याचे केणी यांनी सांगितले.
स्वाभिमान तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केणी बोलत होते. यावेळी स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगरसेवक यतीन खोत, बाबा परब, विक्रांत नाईक, राजन सारंग, राजन चव्हाण, बाबू तोरसकर, प्रशांत मिठबावकर, विकी मालवणकर, शिवदास चव्हाण, विराज तळाशिलकर, पराग नार्वेकर, गुरूनाथ चव्हाण, सचिन आंबेरकर तसेच इतर वाळू व्यावसायिक उपस्थित होते.
वाळू लिलाव प्रक्रिया जाणीवपूर्वक रखडवली जात आहे. वाळू व्यावसायिक यामुळे पूर्णपणे कर्जबाजारी होवून अडचणीत सापडलेले आहेत. वाळू उपसा करण्यासाठी कामगार आणून त्यांना पगार दिला जात आहे. मात्र काम सुरू झालेले नसल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. याला सर्वस्वी सत्ताधारी आणि प्रशासन दोघेही जबाबदार आहेत. येत्या दहा दिवसात वाळु टेंडर उघडली नाहीत, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही केणी, खोत यांनी दिला.
तहसीलदारांची सखोल चौकशी व्हावी!
तहसीलदार समीर घारे यांनी धडक कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त का नेला नाही? एका पाटीर्तून कारवाई करण्याचा प्लॅन झाला आणि महसूलचे पथक पोहचले. त्यामुळे महसुलची पार्टी कशासाठी होती? आणि कोणी आयोजित केली होती? तसेच कारवाईत घटनास्थळी नेमके काय झाले? याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. याचीही मागणी वरिष्ठ स्तरावर करणार असल्याचे मंदार केणी यांनी सांगितले.