शाखा कालव्यातून अद्याप पाणी नाहीच

By admin | Published: April 29, 2016 12:13 AM2016-04-29T00:13:39+5:302016-04-29T00:18:55+5:30

पाणी टंचाईच्या बसताहेत झळा : ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा, विनोद तावडेंच्या आदेशाकडे दुर्लक्ष; गाळेल येथे कालवा दुरूस्तीचे काम सुरु

There is no water from the branch canal | शाखा कालव्यातून अद्याप पाणी नाहीच

शाखा कालव्यातून अद्याप पाणी नाहीच

Next

नीलेश मोरजकर -- बांदा --बांदा शहर व परिसरातील गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई उग्र रुप धारण करत असल्याने गोव्यातून नेतर्डे, बांदा मार्गे ओटवणेपर्यंत जाणाऱ्या तिलारी शाखा कालव्यातून तातडीने पाणी सोडावे, असे आदेश राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तिलारी कालवा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई येथे दिले होते. मात्र मंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवून कालवा विभागाने महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर गाळेल येथे कालवा दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने यावर्षी कालव्यातून पाणी सोडण्यास कालवा विभागाला मुहुर्त सापडणे अशक्य आहे. कालवा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे स्थानिकांवर मात्र पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे.
गतवर्षी मार्च महिन्यामध्ये शाखा कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे बांदा शहर व परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे गतवर्षी या परिसराला पाणीटंचाईची झळ बसली नव्हती. यावर्षी बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी कालव्यातूून पाणी सोडण्याबाबत वेळोवेळी कालवा विभागाकडे पाठपुरावा केला होता. मात्र कालवा विभागाकडून सकारात्मक प्र्रतिसाद न मिळाल्याने सरपंच मंदार कल्याणकर, माजी सरपंच शितल राउळ यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे कैफियत मांडली होती.
बांदा परिसरात होणारी पाणीटंचाई लक्षात घेता मंत्री तावडे यांनी मुंबईत मंत्रालयात १५ मार्च रोजी तातडीने तिलारी कालवा विभागाचे मुख्य अभियंता सी. अन्सारी यांची बैठक घेऊन बांदा शाखा कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे दोन दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन अभियंता अन्सारी यांनी दिले होते, तसेच डोंगरपाल येथील कालव्यातून मोठया प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याने याचा लाभ कालवा क्षेत्रातील २६ किलोमीटर पर्यंतच्या गावांना होणार होता.
हे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र मंत्री तावडे यांनी आदेश देऊन दिड महिना उलटला तरीही अद्यापपर्यंत कालव्यातून पाणी सोडण्यात न आल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्यानंतर लागलीच कालवा दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असताना कालवा विभागाने गाळेल येथे उन्हाळ्याच्या तोंडावर दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने कालव्यातून पाणी सोडणे अडचणीचे ठरत आहे. एप्रिल व मे महिन्यात खऱ्या अर्थाने पाण्याची आवश्यकता असते. मात्र याच कालावधीत कालव्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याने यावर्षी पाणीटंचाई जाणविणार आहे.
बांदा परिसरातून जाणाऱ्या शाखा कालव्यात जंगली झाडांची वाढ झाली असून या कालव्याची साफसफाई करणे हे गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे या कालव्याची दुरुस्तीच करण्यात न आल्याने यातील पाणी कचऱ्यामुळे दूषित होण्याची शक्यता आहे.
सहा वर्षांपूर्वी मे २0१0 मध्ये पाणी चाचणी घेताना बांदा-सटमटवाडी येथे कालवा फुटण्याचा प्रकार घडला होता. या चुका टाळण्यासाठी कालवा दुरुस्तीची कामे ही पावसाळयानंतर लागलीच सुरु करणे गरजेचे आहे. मात्र कालवा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे स्थानिकांना पाणीटंचाईशी सामान करावा लागत आहे.

Web Title: There is no water from the branch canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.