केरमध्ये अज्ञात तापाची भीती कायम
By admin | Published: January 16, 2016 11:32 PM2016-01-16T23:32:22+5:302016-01-16T23:32:22+5:30
दोन पथके तैनात : रूग्णांनी घाबरून जाऊ नये, आरोग्य यंत्रणेचे आवाहन
साटेली भेडशी : केर गावात अज्ञात तापसरीने थैमान घातल्याच्या ‘लोकमत’च्या बातमीनंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. शनिवारी जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम, तालुका आरोग्य अधिकारी तुषार चिपळुणकर यांनी तातडीने साटेली भेडशी आरोग्य केंद्रांसह केर येथे जाऊन तापाने बाधीत रूग्णांची चौकशी केली. सर्व रूग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन जिल्हा रूग्णालयातून तापाचे निदान करून त्वरित औषधोपचार करण्याची कार्यवाही त्यांनी सुरू केली. यासाठी दोन स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत.
केर गावात विचित्र तापाने थैमान घातल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या तापाने अनेक रूग्ण बाधीत झाले असून या विचित्र तापाने रूग्णांत भीती संचारली आहे. याची माहिती मिळताच प्रसारमाध्यमातून याचे वृत्त प्रसिद्ध झाले. यामुळे शनिवारी आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. तालुका आरोग्य विभागाने शुक्रवारी गावात जात विशेष आरोग्य तपासणी केली. यावेळी आतापर्यंत २६ रूग्णांना या तापाची लागण झाली आहे. यातील दहा रूग्ण साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले आहेत. पण यंत्रसामग्री व आवश्यक लॅब असिस्टंटची कमतरता असल्याने यात अडचणी निर्माण होत आहेत. रूग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी होत असून, त्यामुळे रूग्णांची मानसिकता आणि आरोग्यही खालावत आहे.
त्यानंतर शनिवारी राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांची भेट घेत तापसरीबाबत चर्चा केली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, माजी सभापती दयानंद धाऊसकर, विठोबा पालयेकर, बाळा नाईक आदी उपस्थित होते. नाडकर्णी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत भविष्यातील धोका ओळखून योग्य उपाययोजना करण्यास सांगितले.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. जंगम यांनी केर गावात जात तापसरीच्या रूग्णांची भेट घेतली. त्यानंतर उशिरा आलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच केर गावातील रूग्णंची भेट घेतली. तापसरीच्या रूग्णांमध्ये डोकेदुखी, पाय दुखणे, दिवसरात्र थंडी वाजणे, जुलाब, उलट्या अशी विचित्र लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे रक्त तपासणीनंतरच उद्यापर्यंत या प्रकरणाचा उलगडा होईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, ते जिल्ह्याच्या समाज कल्याण बैठकीत व्यस्त असल्याने प्रत्यक्ष रूग्णांपर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र, याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मी वेळोवेळी तापसरी आणि उपाययोजनांबाबत माहिती घेत आहे. तापसरीच्या रूग्णांत अल्पावधीत कमालीची वाढ झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीला जबाबदार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढा, असे आदेशही आपण दिल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
घाबरू नका सहकार्य करा : आरोग्य विभाग
केर येथील तापावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दोन स्वतंत्र पथके गावात तैनात करण्यात आली असून सर्व रूग्णांचे रक्त नमुने ओरोस येथील रक्तपेढीत पाठविण्याची कार्यवाही अंतिम टप्यात असल्याचे आरोग्य विभागाने शनिवारी सायंकाळी माहिती दिली. शिवाय त्याचा अहवाल मिळल्यानंतर प्रत्येक रूग्णावर योग्य ते वैद्यकीय उपचार केले जातील. या काळात कोणीही घाबरून न जाता पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.