आमदारांच्या दणक्यानंतर आली जाग : महामार्ग चौपदरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 06:59 PM2019-11-11T18:59:30+5:302019-11-11T19:04:19+5:30
यावेळी अधिका-यांना आठ दिवसांत या सर्व समस्या सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महामार्ग ठेकेदाराने पावशी बेलनदी ते भंगसाळ नदी यादरम्यानच्या सर्व्हिस रोडवर कार्पेट केले असून, खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे झालेले निकृष्ट काम, सर्व्हिस रोडची झालेली दुरवस्था, धुळीच्या साम्राज्यामुळे वाहनचालक, प्रवासी व नागरिकांना सहन कराव्या लागणाºया त्रासाबाबत आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होऊन ठेकेदार व महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांना सोमवारी जाब विचारला होता. यावेळी अधिका-यांना आठ दिवसांत या सर्व समस्या सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महामार्ग ठेकेदाराने पावशी बेलनदी ते भंगसाळ नदी यादरम्यानच्या सर्व्हिस रोडवर कार्पेट केले असून, खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.
महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी याबाबत महामार्ग अधिकाºयांना अनेकदा सूचना दिल्या. मात्र, अनेक समस्या ‘जैसे थे’ होत्या. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम झाल्याने पावसाळ्यात कुडाळ व पावशी येथे ठिकठिकाणी पुराची समस्या निर्माण झाली. भातशेतीत पाणी व माती घुसली. अनेकांच्या घरांमध्ये पाणी घुसले. पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते.
महामार्गावरील धुळीच्या त्रासाने प्रवासी व नागरिक त्रस्त आहेत. मात्र, ठेकेदार व महामार्ग अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेत ठेकेदार व अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. महामार्गावरील सर्व समस्या तत्काळ सोडविण्याच्या सक्त सूचना त्यांनी अधिकाºयांना दिल्या होत्या.
आमदार वैभव नाईक यांच्या दणक्यामुळे अधिका-यांनी त्वरित महामार्गावरील समस्या मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. कुडाळ तालुक्यात सर्व्हिस रोडवर कार्पेट करण्याचे काम सुरू आहे. तसेच महामार्गावरील खड्डे बुजविण्यात येत आहेत. त्यामुळे धुळीचा त्रासही कमी झाला आहे. महामार्गावर कुडाळ आणि कणकवलीमध्येच उशिराने काम सुरू झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.