दोडामार्ग तालुक्यात खडी क्रशरविरोधात आंदोलन पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:29 PM2019-12-19T23:29:47+5:302019-12-19T23:30:48+5:30
साखळी उपोषण सुरु : बेसुमार खडी उत्खलनामुळे तळेखोल गाव उद्ध्वस्थ होण्याच्या मार्गावर
नीलेश शेटकर/दोडामार्ग : सात-आठ खडी क्रशरचा मारा झेलून उद्ध्वस्थ होण्याच्या वाटेवर असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल गावातील नागरिकांनी खडी क्रशरविरोधात एल्गार पुकारल्याने या भागात खडी क्रशर चालविणा-या खडी क्रशर मालकांचे तसेच वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत. तळेखोल पंचायत क्षेत्रातील खडी क्रशर कायमचे बंद करावेत यासाठी गुरुवार (दि.१९)पासून येथील तहसीलदार कार्यालयासमोर ग्रामस्थांनी साखळी उपोषण चालविले आहे. जोपर्यंत खडी क्रशर बंद होणार नाहीत, तोवर हे आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे. सरकारने याबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
गोव्यातील खाण, वाळू तसेच खडी उत्खननावर न्यायालयाने निर्बंध आणल्यानंतर गोव्यातील अनेक व्यावसायिक व राजकारण्यांनी आपला मोर्चा नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागाकडे वळविला आहे. येथील काही लोकप्रतिनिधी व सरकारी यंत्रणांना हाताशी धरून ठिकठिकाणी बेसुमार उत्खनन करून येथील नैसर्गिक संपत्ती बेकायदा हडप करण्याचे सत्र गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. यात गोव्यातील काही व्यावसायिक व राजकारणी आघाडीवर आहेत.
काही वर्षांपूर्वी फक्त एका क्रशरसाठी परवानगी दिली होती; परंतु तळेखोल गावात आज जवळपास आठ क्रशर सुरू असून अनेक ठिकाणी बेकायदा दगड फोडून पळविले जात आहेत. यामुळे तळेखोल भागातील बहुतेक डोंगर भूसुरुंग पेरून उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी आज खोदकाम केलेले उघडे डोंगर दिसून येत आहेत. वारंवार होणाºया भूसुरुंगांच्या स्फोटांमुळे येथील बहुतेक घरांना तडे गेले असून येथील जलस्रोत पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक विहिरींनी तळ गाठला असून येथील जीवदायिनी असलेल्या नदीचीही अवस्था बिकट झाली आहे.
लेखी आश्वसन मिळेपर्यंत उपोषण : सरपंच सावंत
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे तळेखोल पंचायतीचे सरपंच सुरेश सावंत यांनी सांगितले की, आतापर्यंत ग्रामस्थांनी खूप काही सोसले आहे. गाव उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचला आहे, त्यामुळे आता गप्प राहणे शक्य नाही. त्यामुळे संपूर्ण गाव एकवटला असून साखळी उपोषण सुरू केले आहे. जोवर खडी क्रशर तसेच खडी उत्खनन बंद करण्यात येत असल्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोवर ग्रामस्थ उपोषण सोडणार नाहीत.
बहुतेक खडी क्रशर मालक गोव्यातील
तळेखोल भागात खडी उत्खनन करणारे बहुतेक व्यावसायिक हे गोमंतकीय आहेत. अल्कॉन या कंपनीच्या नावेही या भागात काही क्रशर चालविण्यात येत असून सध्या जवळपास आठ क्रशर या परिसरात कार्यरत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तळेखोल भागात घेतलेल्या जागेतही एक क्रशर सुरू असल्याचे सांगण्यात येते. तसेच येथील बहुतेक खडी ही बेकायदा गोव्यात हलविली जाते. या वाहतुकीवर कोणाचे नियंत्रण नाही. त्यामुळे या सीमावर्ती भागातील बहुतेक रस्ते खड्डे व धुळीत हरवले आहेत. याचा प्रचंड मनस्ताप येथील नागरिकांना सोसावा लागतो.