कोकण विकासाला दिशा मिळणार

By admin | Published: April 13, 2016 08:57 PM2016-04-13T20:57:37+5:302016-04-13T23:36:08+5:30

प्रमोद जठार : स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळाची घोषणा; देवेंद्र फडणवीस यांचे कोकणवर विशेष लक्ष

There will be direction for development of Konkan | कोकण विकासाला दिशा मिळणार

कोकण विकासाला दिशा मिळणार

Next

मालवण : कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळाची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणावर विशेष लक्ष दिले आहे. पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून पर्यटनाला वेगळी दिशा मिळणार असून, गेली ६० वर्षे रखडलेला कोकण विकासाचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्याचे काम भाजप युती शासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे. जे सिंधुदुर्गाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना जमले नाही ते विदर्भच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी कोकण पर्यटन महामंडळ स्थापन करून दाखविले असल्याचा चिमटा भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता काढला.
दरम्यान, आगामी निवडणुकांत शिवसेनेसोबत भाजपकडून युती करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. देशात व राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजप पक्षाचे १३ करोडपेक्षा जास्त सभासद आहेत. त्यामुळे आगामी कालखंडात लोकप्रतिनिधींची वाढ करणे व संघटना मजबुतीकरण हा विकासाबरोबरच भाजपचा अजेंडा राहणार आहे. कुडाळ नगरपंचायतीबरोबर जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वासही जठार यांनी व्यक्त केला.
मालवण पिंपळपार येथील किल्ले प्रेरणोत्सव कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत जठार बोलत होते. यावेळी प्रदेश सदस्य विलास हडकर, भाऊ सामंत, विजय केनवडेकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, संदीप शिरोडकर, पंकज पेडणेकर, संतोष पाताडे, आदी उपस्थित
होते. कोकणचा तीन हजार ५५
कोटींचा पर्यटन विकास आराखडा बनविण्यात आला आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक यासाठी अल्पदराने कर्जपुरवठा करणार आहे. स्वदेश दर्शन पर्यटन सेवा अधिनियम व अन्य माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यटन विकास व रोजगार निर्मिती होणार आहे, असे सांगताना मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय कोकणसाठी नवी विकासाची दालने असून, कोकणी जनतेच्यावतीने त्यांचे आभार मानत असल्याचे जठार यांनी सांगितले. मालवण भुयारी गटार योजना रखडली आहे. हे नगरपरिषदेचे अपयश आहे. यात भ्रष्टाचारही झाला
आहे. योग्य पाठपुरावा न झाल्याने योजना रखडली व खड्डेमय रस्त्यातून मालवणी जनतेला त्रास देण्याचे
काम सुरू आहे. आगामी काळात मालवण नगरपरिषदेवर झेंडा फडकविताना भुयारी गटार योजनेबरोबरच अन्य विकास योजनांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जठार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

मंत्रिमंडळाची हजेरी
किल्ले सिंधुदुर्गचा ३५० वा वर्धापनदिन
२२ एप्रिलपासून सिंधुदुर्ग महोत्सव म्हणून महाराष्ट्र शासन प्रेरणोत्सव समिती मालवणच्या सहभागातून करीत आहे. या महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यासह केंद्र्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक राज दत्त यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच अन्य मंत्री यांना निमंत्रित करण्यात आल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.

‘सी-वर्ल्ड’बाबत गतिमान कार्यवाही
जठार म्हणाले, मालवण तालुक्यातील वायंगणी तोंडवळी येथे प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत वर्षभरापूर्वी कमी जागेची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यावतीने प्रकल्पाबाबत गतिमान हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. ३५० एकर जागेत प्रकल्प साकारण्यासाठी अंतिम आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. प्रकल्पाबाबत प्रकल्प ठिकाण व अन्य माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना येत्या दहा दिवसांत प्रकल्प माहिती अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. येत्या काही महिन्यांत आराखडा निश्चित करून सर्वांना विश्वासात घेताना जागेची भूसंपादन प्रक्रियाही हाती घेण्यात येईल.

Web Title: There will be direction for development of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.