कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय घडामोडीना येणार वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:12 PM2017-12-06T15:12:16+5:302017-12-06T15:21:36+5:30
कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची विविध प्रकारे मोर्चे बांधणी सुरु आहे. विविध राजकीय पक्षाकडून स्वतंत्रपणे तर काही नागरिकांकडून शहर विकास आघाडी स्थापन करून ही निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे. या सर्वांनाच आता नवीन प्रभाग रचना तसेच प्रभागातील आरक्षणाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर राजकीय घडामोडीना वेग येणार आहे.
सुधीर राणे
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची विविध प्रकारे मोर्चे बांधणी सुरु आहे. विविध राजकीय पक्षाकडून स्वतंत्रपणे तर काही नागरिकांकडून शहर विकास आघाडी स्थापन करून ही निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे. या सर्वांनाच आता नवीन प्रभाग रचना तसेच प्रभागातील आरक्षणाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर राजकीय घडामोडीना वेग येणार आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीची पूर्व तयारी किंवा रंगीत तालीम म्हणून प्रभाग 1 मधील पोट निवडणुकीकडे पाहिले जात होते. मात्र, या पोट निवडणुकीसाठी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही .
अॅड. प्रज्ञा खोत या 6 मे 2016 रोजीची विशेष सभा आणि 21 जून 2016 रोजीची सर्वसाधारण सभा याना गैरहजर राहिल्या. तर 23 ऑगस्टची विशेष सभा, 26 ऑगस्टची विशेष सभा, 2 सप्टेंबरची सर्वसाधारण सभांनाही अनुपस्थित राहिल्या. त्यानंतर 3 डिसेंबरच्या सभेला अनुपस्थित राहत असल्याचा अर्ज त्यांनी नगराध्यक्षांकडे सादर केला होता.
अॅड. खोत या सलग सहा सभांना हजर नसल्याने त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र करावे अशा मागणीचा अर्ज शहरातील निम्मेवाडीतील नागरिक विजय सखाराम राणे यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे 26 डिसेंबर रोजी सादर केला होता. या अर्जानुसार मुख्याधिकार्यांनी सभांचे हजेरीपत्रक तपासले.
यात त्या सलग सहा महिन्यापेक्षा अधिक काळ सभांना अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक अधिनियम 1966 चे कलम 44 नुसार, पालिकेच्या सदस्यांच्या अनर्हता पोट कलम (1) (ड) मधील तरतूदीनुसार जिल्हाधिकार्यांकडे नियमानुसार वस्तुस्थिती अहवाल पाठविला होता. तसेच अॅड.खोत यांना अपात्र ठरविण्याबाबतचा निर्णय घ्यावा असे सुचित केले होते.
वस्तुस्थितिची माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेविका अड़. प्रज्ञा खोत यांना अपात्र ठरविले होते. त्यामुळे कणकवलीतील प्रभाग 1 मधील एका जागेसाठी पोटनिवडणुक जाहिर करण्यात आली होती. पण थोड्याशा कालावधीसाठी नगरसेवक पदी कार्यरत रहाण्यास कोणीच तयार नसल्याने उमेदवारी अर्ज भरण्यात आला नव्हता.
राजकीय पक्षानीही जनतेचा वेळ व पैसा वाचावा यासाठी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ही निवडणूक होऊ शकलेली नाही. पर्यायाने कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम या निवडणुकीच्या निमित्ताने होऊ शकलेली नाही.
कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत यावर्षी पासून थेट नगराध्यक्ष निवड करायची आहे. नगराध्यक्ष पदासाठी खुला प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक आहेत. या इच्छुकांकडून सध्या मोर्चे बांधणी सुरु आहे.
नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविताना सोबत चांगल्या नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे पॅनेल असेल तर विजय मिळविणे आणखिन सुखकर होणार आहे. त्यासाठीही अनेक इच्छुकांचेही प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे प्रभाग रचना व प्रभाग निहाय पडणारे आरक्षण यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे या आरक्षणाची वाट पाहिली जात आहे.
नवीन प्रभाग रचना झाल्यानंतर त्या प्रभागातील आरक्षण जाहिर केले जाणार आहे. त्यामुळे नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांना आपल्या विजयासाठीची समिकरणे जुळविणे सोपे होणार आहे. तसेच आरक्षणानुसार कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायची हे सुध्दा निश्चित करता येणार आहे.
कणकवली नगरपंचयतीसाठी 17 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरु आहे. काही विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, प्रभाग आरक्षणानंतरच त्यांची ही इच्छा फलद्रुप होणार का हे स्पष्ट होणार आहे. अर्थात पक्षाकडून त्याना पुन्हा संधी दिली जाणार का? हाही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सध्या तरी सर्वच इच्छुक उमेदवारांना प्रभागानुसार पडणाऱ्या आरक्षणाची प्रतीक्षा आहे.