मुंबई-गोवा महामार्गावर सहा ठिकाणी बस थांबे होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:48 PM2021-01-30T12:48:16+5:302021-01-30T12:55:25+5:30
state transport Sindhudurgnews- मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्हा प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण या प्रमुख शहरासह टाकेवाडी ते नडगिवे या ६ किलोमीटर मार्गाचा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व्हे करून प्रवासी वर्गाच्या सोयीसाठी मुंबई - गोवा महामार्गावर नव्याने एकूण ६ बस थांबे बांधून देण्यात यावेत, अशी मागणी खारेपाटणचे सरपंच रमाकांत राऊत यांनी अधिकाऱ्यांकडे केली. त्यांच्या या मागणीला अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच या प्रलंबित बस थांब्यांचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्हा प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण या प्रमुख शहरासह टाकेवाडी ते नडगिवे या ६ किलोमीटर मार्गाचा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व्हे करून प्रवासी वर्गाच्या सोयीसाठी मुंबई - गोवा महामार्गावर नव्याने एकूण ६ बस थांबे बांधून देण्यात यावेत, अशी मागणी खारेपाटणचे सरपंच रमाकांत राऊत यांनी अधिकाऱ्यांकडे केली. त्यांच्या या मागणीला अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच या प्रलंबित बस थांब्यांचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय खारेपाटणचे शाखा अभियंता डी. जी. कुमावत,महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक निरीक्षक जी. बी. गोरे, के. सी. सी, बिल्डकॉन कंपनीचे वरिष्ठ इंजिनियर द्विवेदी राजीवधर, नडगिवे सरपंच अमित मांजरेकर, महेश कोळसुलकर, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर, महेंद्र गुरव, नडगिवे ग्रामस्थ प्रमोद आंबेरकर, खारेपाटण ग्रामस्थ निलेश गुरव आदी उपस्थित होते.
महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने खारेपाटण येथील मुंबई - गोवा महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून महामार्गावर आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या नागरी वस्तीच्या ठिकाणी बस थांबे नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. खारेपाटणचे सरपंच राऊत यांनी याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन अधिकारी खारेपाटण येथे आले होते.
दरम्यान, खारेपाटण टाकेवाडी ते नडगिवे बांबरवाडी या सहा किलोमीटर मार्गाचा प्रत्यक्ष सर्व्हे करण्यात आला. त्याचा अहवाल महामार्ग प्राधिकरण यांना एसटी महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्यावतीने त्वरित देण्यात येऊन प्रवासी, नागरिक यांची गरज लक्षात घेऊन बसथांबे बांधण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.