गोव्यातून येणाऱ्या नागरिकांचे महाराष्ट्र सीमेवर थर्मल स्कॅनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 07:15 PM2021-04-22T19:15:20+5:302021-04-22T19:17:20+5:30
CoronaVIrus Sindhudurg : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णांचे प्रमाण रोखण्यासाठी बुधवारी सकाळपासून महाराष्ट्र-गोवा सीमेवर बांदा-सटमटवाडी येथे महसूल, पोलीस, प्रशासनाकडून तपासणी सुरू करण्यात आली. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या प्रवासी नागरिकांची थर्मल गन स्कॅनिंग चाचणी केल्यानंतर प्रवेश देण्यात येत आहे. तपासणी नाक्यावर प्रवाशांची वा वाहनाची कोणतीही अडवणूक न करता फक्त प्रवाशांची थर्मल गन स्कॅनिंग चाचणी, नाव, पत्ता, मोबाइल नंबर नोंदवहीत लिहिण्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे.
बांदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णांचे प्रमाण रोखण्यासाठी बुधवारी सकाळपासून महाराष्ट्र-गोवा सीमेवर बांदा-सटमटवाडी येथे महसूल, पोलीस, प्रशासनाकडून तपासणी सुरू करण्यात आली. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या प्रवासी नागरिकांची थर्मल गन स्कॅनिंग चाचणी केल्यानंतर प्रवेश देण्यात येत आहे. तपासणी नाक्यावर प्रवाशांची वा वाहनाची कोणतीही अडवणूक न करता फक्त प्रवाशांची थर्मल गन स्कॅनिंग चाचणी, नाव, पत्ता, मोबाइल नंबर नोंदवहीत लिहिण्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे.
या कामासाठी चार प्राथमिक शिक्षकांची नेमणूक केली आहे. थर्मल गन वापरण्यासाठी एक आरोग्य सेवकही तपासणी नाक्यावर कार्यरत आहे. वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासणी नाक्यावर अँटिजेन रॅपिड टेस्ट सुरू करणे गरजेचे होते. पण सीमा तपासणी नाक्यावर अँटिजेन रॅपिड टेस्ट करताना कोणतेही पथक दिसून आले नाही.
याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाला अशी साधी तपासणी करून काय सिद्ध करायचे आहे हे कळणे अवघड आहे. शासनाने गोव्यासह इतर सहा राज्ये ही प्रवासासाठी संवेदनशील जाहीर केली आहेत. त्यामुळे सीमेवर बांदा-सटमटवाडी तपासणी नाक्यावर महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे थर्मल स्कँनिग पथक तैनात आहे. सरपंच अक्रम खान, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत यांनी पाहणी केली.
महाराष्ट्र हद्दीतून गोवा सीमेवर जाणाऱ्या प्रवाशांना मुभा, तर गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल गन स्कँनिग चाचणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र व गोवा सीमा बंद केलेली नाही.
- राजाराम म्हात्रे,
तहसीलदार, सावंतवाडी