‘ते’ मला ठारच मारणार होते : संदीप सावंत

By admin | Published: May 6, 2016 01:26 AM2016-05-06T01:26:02+5:302016-05-06T01:27:41+5:30

तक्रार मागे घेणार नाही : नीलम राणे यांच्यामुळे वाचलो

They were going to kill me: Sandeep Sawant | ‘ते’ मला ठारच मारणार होते : संदीप सावंत

‘ते’ मला ठारच मारणार होते : संदीप सावंत

Next

चिपळूण : रत्नागिरी येथील मराठा आरक्षणाच्या मेळाव्याला मी हजर राहिलो नाही याचा राग मनात धरून माजी खासदार नीलेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केली. ते मला ठारच मारणार होते; परंतु वेळ चुकली. सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी केलेले काम व आई-वडिलांची कृपा यामुळेच मी जिवंत आहे. नीलमताई राणे व आमदार नीतेश राणे यांच्यामुळेच आपण वाचलो, अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी दिली.
काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना ठाणे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ते चिपळूणमध्ये आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मारहाण प्रकरणाची माहिती देत तक्रार मागे न घेण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
सावंत यांना रविवारी (दि. २४ एप्रिल) माजी खासदार नीलेश राणे व त्यांचे सहकारी तुषार पांचाळ, कुलदीप खानविलकर, मनीष सिंग, अण्णा ऊर्फ जयकुमार पिल्लई यांनी चिपळूण ते मुंबई दरम्यान मारहाण केली. शिवीगाळ केली. त्याचा पाढा सावंत यांनी आज वाचला. केवळ आपण केलेले आतापर्यंतचे सामाजिक काम, अपघातात जखमी झालेल्यांचे वाचविलेले प्राण या पूर्वपुण्याईमुळे व आई-वडिलांच्या कृपेमुळे, माझी पत्नी, भाचे, भाऊ, मेहुणे व इतर नातेवाइकांनी धावपळ केल्यामुळेच आपण आज जिवंत आहोत. एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याचा आपल्याला आशीर्वाद नाही, असे सावंत यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सावंत बनाव करीत असल्याचे म्हटले आहे. यावर सावंत म्हणाले, नारायण राणे यांच्याबाबत मी काय बोलणार? मी एवढा मोठा नाही. परंतु, मी असे काय पाप केले की त्याची शिक्षा नीलेश राणे यांनी मला दिली हेच मला माहीत नाही. हे का घडले तेच कळत नाही. आपण पैसे मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नीलेश राणेंशिवाय आपण कोणाला देव मानले नाही. आठ वर्षे आपण त्यांची सेवा केली. त्यांनी काय आरोप करावेत, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, आठ वर्षांत त्यांनी किती पैसे दिले ते एकदा जाहीर करावे. त्यांच्या आरोपाचे उत्तर योग्य वेळी योग्य ठिकाणी देईन. मी घरासाठी पैसे मागितल्याचे सांगण्यात येते. परंतु, जिल्ह्यात एका तरी कार्यकर्त्यांचे त्यांनी घर बांधून दिले आहे का, ते सांगावे. मी त्यांच्या घरचा होतो असे ते म्हणतात. मग अशी वेळ माझ्यावर का यावी? आता नीलेश राणे माझ्यासाठी देव राहिले नाहीत. माजी मुख्यमंत्री राणे ज्येष्ठ आहेत. किती झाले तरी त्यांच्याबाबत आपण काही बोलू शकत नाही. परंतु, त्यांच्या कुटुंबातीलच नीलमताई राणे व आमदार नितेश राणे यांच्यामुळेच आपला जीव वाचला. सर्व सत्य जगासमोर येऊ द्या. मेलो तरी बेहत्तर, मी माघार घेणार नाही. सर्वपक्षीयांना दहशत दाखविण्यासाठी मला ठार मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मला ज्यांनी मारले त्यांचीच नावे मी घेतली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षातून आपली हकालपट्टी करणार असल्याचे सूतोवाच नारायण राणे यांनी केले. पण, मी मरेपर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून राहीन. मला आता कशाचीच अपेक्षा नाही. मला पक्ष महत्त्वाचा आहे. नवीन तालुकाध्यक्षाची नियुक्ती केली तर त्याला आपण आनंदाने स्वीकारू. आपली पक्षातून हकालपट्टी केली तरी तो निर्णय आपण स्वीकारू. राणे यांनी आपल्याला गाडी दिली असल्याबाबत बोलले जाते. माझ्याकडे जी गाडी आहे ती पक्षाची आहे. ज्या दोन अ‍ॅम्ब्युलन्स आहे त्यातील एक नीलेश राणे यांची आहे, तर दुसरी माझ्या पत्नीच्या नावे आहे. ती मी कर्ज काढून घेतली आहे. त्याची किल्ली सावर्डे येथील एका पेट्रोल पंपात असते. त्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

सावंत यांना सुरक्षा
संदीप सावंत गुरुवारी सायंकाळी चिपळूण येथे आपल्या निवासस्थानी आले असता त्यांची पत्नी शिवानी यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी ग्रामीण भागातून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसही उपस्थित होते. सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सावंत यांना पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. तपास सुरू असेपर्यंत एक गनमॅन सुरक्षेसाठी असेल, असे सहायक पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांनी सांगितले.

संदीप सावंत म्हणतात...
मला कोणावरही टीका करायची नाही, योग्य वेळ येताच सव्याज उत्तर देईन.
यापुढे सामाजिक कार्यकर्ता म्हणून जनतेची सेवा करायची आहे.
मरेपर्यंत मी काँग्रेस कार्यकर्ता म्हणूनच राहीन. माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे.
मला पक्षातून काढले तर तो निर्णय आनंदाने स्वीकारू, नवीन तालुकाध्यक्षालाही आनंदाने स्वीकारू.
८ वर्षांत नीलेश राणे यांनी किती पैसे दिले ते जाहीर करावे.

Web Title: They were going to kill me: Sandeep Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.