गाव करील ते राव न करील!
By admin | Published: October 19, 2015 09:43 PM2015-10-19T21:43:18+5:302015-10-19T23:44:28+5:30
ग्रामस्थांचे श्रमदान : एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची बचत
रहिम दलाल - रत्नागिरी
जिल्ह्यात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे लाखो लीटर्स पाणी अडविले गेले असून, श्रमदानामुळे शासनाच्या सुमारे एक कोटी रुपयांची बचत झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११५० बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
मागील उन्हाळ्यात जिल्ह्यात ९८ गावातील २२७ वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई उद्भवली होती. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषदेकडून त्यावर आतापासून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात सुमारे १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे. हे बंधारे उभारण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला उद्दिष्ट देण्यात आले आहे.
आॅक्टोबर, २०१५ पासून जिल्ह्यात गावोगावी वनराई, विजय आणि कच्चे बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या बंधाऱ्यांच्या कामांमध्ये स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थीवर्ग, शिक्षक, ग्रामसेवक व कृषी विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. या मोहिमेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी काही ठिकाणी बंधाऱ्यांना भेटी देऊन लोकांना प्रोत्साहन दिले. तसेच जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष बंधाऱ्यांच्या बांधकामांची पाहणी केली.
जिल्ह्यात या बंधाऱ्यांची कामे बहुतांश गावांमध्ये सुरु आहेत. काही गावांमध्ये ८ ते १० बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बंधारे उभारण्याचे समोर ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने जोरात कामे सुरु आहेत. उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामांसाठी हजारो हात श्रमदान करीत आहेत. तसेच या बंधाऱ्यांसाठी लागणारे काही साहित्य काही कंपन्यांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांसाठीचे साहित्य व मजुरीचा एक कोटीपेक्षा जास्त होणारा शासनाचा खर्च वाचला आहे. तसेच लाखो लीटर्सच्या पाण्याची बचतही झाली आहे. या बंधाऱ्यांमुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
तालुकावनराई बंधारे
मंडणगड१२४
दापोली१६१
खेड१७७
चिपळूण१६३
गुहागर१३७
संगमेश्वर१३७
रत्नागिरी २४
लांजा११८
राजापूर११२
एकूण११५०
आवश्यक साहित्य काही कंपन्यांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांसाठीचे साहित्य व मजुरीचा एक कोटीपेक्षा जास्त होणारा शासनाचा खर्च वाचला आहे
युध्दपातळीवर काम : मोठे संकट टळणार?
लोकसहभागातून जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईचे मोठे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. या बंधाऱ्यावर होणारा कोट्यवधीचा खर्च वाचणार आहे. अनेक गावांमध्ये असे बंधारे बांधण्यात आले आहेत.