जिल्हा बँक निवडणुकीत गद्दारी केली त्यांना पक्षाची पदे मिळणार नाहीत, राजन तेलींचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 07:07 PM2022-01-04T19:07:58+5:302022-01-04T19:11:34+5:30
जिल्हा बँकेत माझ्या झालेल्या पराभवाबाबत मी नंतर बोलणार आहे. सध्या मात्र जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात आली त्याचा मला मोठा आनंद.
कणकवली : जिल्हा बँक निवडणुकीत ज्यांनी गद्दारी केली, चुकीचे काम केले त्यांना यापुढे पक्षाची पदे मिळणार नाहीत. सगळ्या गोष्टींचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना दिला जाईल. आतापर्यंत मी सगळ्यांशीच सौजन्याने वागलो. मात्र पुढील काळात चुकीचं काम झाले तर मी जिल्हाध्यक्षपदाचे अधिकार निश्चितपणे वापरेन असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला आहे. कणकवली येथील भाजप कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राजन तेली म्हणाले, जिल्हा बँकेत माझ्या झालेल्या पराभवाबाबत मी नंतर बोलणार आहे. सध्या मात्र जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात आली त्याचा मला मोठा आनंद आहे. मी राजीनामा दिल्याचे जाहीर केल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह सर्वच पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांचे फोन आले. या सर्वांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. तसेच मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचेही अगोदरच स्पष्ट केले होते.
मात्र , सर्वांच्या आग्रही विनंतीनंतर पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे. मात्र आता सर्वांशी सौजन्याने वागण्याबाबत विचार केला जाणार आहे. निवडणुकीत जे गद्दारी करतील, पक्षाच्या विरोधात काम करतील त्यांना यापुढे पदे मिळणार नाहीत. त्या सर्वांचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला जाणार असल्याचाही इशारा राजन तेली यांनी यावेळी दिला.