डोळ्यांत मिरची पूड टाकून युवकास झाडाला बांधले
By admin | Published: February 12, 2017 10:51 PM2017-02-12T22:51:58+5:302017-02-12T22:51:58+5:30
वेताळबांबर्डे येथील घटना : युवक शिवसेना उमेदवाराचा भाचा; दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे पंचायत समिती मतदारसंघातील शिवसेना उमेदवार स्नेहा मिलिंद दळवी यांच्या प्रचारासाठी आलेला त्यांचा कोलगाव- भोमवाडी येथील भाचा अक्षय दीपक निवळे (वय १९) याच्या डोळ््यात मिरची पूड टाकून त्याचे हात-पाय बांधून त्याला झाडाला बांधून ठेवल्याची घटना वेताळबांबर्डेे येथे घडली आहे. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वेताळबांबर्डे पंचायत समिती मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार स्नेहा मिलिंद दळवी यांचा अक्षय हा भाचा असून, तो सध्या गोवा येथे असतो. तो स्नेहा दळवी यांच्या प्रचारासाठी वेताळबांबर्डे येथे काही दिवसांपूर्वी आला होता. शनिवारी स्नेहा दळवी या आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी निवजे येथे गेल्या होत्या. तर अक्षय हा घरी एकटाच थांबला होता.
दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अक्षय हा टी.व्ही. बघत असताना अज्ञात दोन व्यक्तींनी अक्षयला हाक देत पिण्यासाठी पाणी मागितले. अक्षयने पाणी नेऊन दिले असता त्या दोघांनी अक्षयच्या तोंडावर पाणी फेकले. तसेच त्याच्या डोळ््यांत चटणी पूड फेकली व अंगाभोवती चादर गुंडाळून घरापासून सुमारे ५० मीटर अंतरावरील जंगलातील झाडाकडे नेत त्याचे हात-पाय बांधले. त्यानंतर त्यांनी अक्षयच्या मोबाईलवरून स्नेहा दळवी यांना फोन लावला व अक्षयला बोलावयास सांगितले. त्यावेळी अक्षयने मावशीला रडत रडत सगळी हकिकत सांगितली. यानंतर त्या दोन अज्ञात व्यक्तींनी अक्षयला तिथेच बांधलेल्या अवस्थेत टाकून पलायन केले. अक्षयचा फोन येताच दळवी व कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवीत तातडीने वेताळबांबर्डे येथील घर गाठले व परिसरात अक्षयचा शोध घेतला असता घराशेजारील ५० मीटरच्या अंतरावर झाडाला टेकलेल्या स्थितीत व हात-पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत अक्षय आढळून आला. या घटनेनंतर घाबरलेल्या अक्षयला नीट बोलताही येत नव्हते. ाा जे काही घडले ते नीट सांगताही येत नाही. त्यामुळे त्याला बांधून ठेवणारे कोण होते हे मात्र समजू शकले नाही. या घटनेनंतर अक्षयच्या वेताळबांबर्डे येथील नातेवाइकांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी मिलिंद दळवी यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती मिळावी याकरिता घटनास्थळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी जाऊन अधिक तपास केला. तसेच अक्षयकडे विचारणा केली. मात्र, घाबरलेल्या अक्षयला नीट असे काहीच सांगता आले नाही. त्यामुळे पोलिसांनाही तपासाची दिशा ठरवता येत नव्हती. तरीही पोलीस घडलेल्या प्रकारामुळे चांगलेच हादरले असून, उमेदवारांच्याच भाच्याच्याबाबतीत असा प्रकार घडल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. (प्रतिनिधी)