सिंधुदुर्गातील असलदेत चोरट्यांनी मंदिरासह शाळा फोडली, ग्रामस्थांमध्ये घबराट
By सुधीर राणे | Published: March 7, 2023 12:32 PM2023-03-07T12:32:42+5:302023-03-07T12:33:33+5:30
कणकवली : कणकवली तालुक्यात चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. असलदे येथील दोन मंदिरांच्या दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या आहेत. तर ...
कणकवली : कणकवली तालुक्यात चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. असलदे येथील दोन मंदिरांच्या दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या आहेत. तर गावातील प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांच्या दरवाजाचे कडी कोयंडे तोडले आहेत. एकाचवेळी गावात तीन ठिकाणी झालेल्या या चोऱ्यांच्या प्रयत्नामुळे ग्रामस्थांमध्येही घबराट पसरली आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासणीच्यावेळी एका ठिकाणी मद्याची बाटलीही आढळून आली आहे. तर तिन्ही ठिकाणी चोरीस विशेष असे काहीच गेलेले नाही. या घटनेची माहिती समजताच सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब, तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी शिंदे, पोलिस पाटील सावित्री पाताडे, ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी असलदे परिसरात रात्रीच्यावेळी पोलिस गस्त ठेवावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.