राज्यात आघाडीबाबत विचार शक्य : तटकरे
By admin | Published: August 18, 2015 11:08 PM2015-08-18T23:08:50+5:302015-08-18T23:08:50+5:30
संघटनात्मक बदल करून पुनर्रचना करावी लागणार आहे. कोकणच्या दौऱ्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा विभागाचा दौरा त्यानंतर राज्याच्या अन्य भागात दौरा करून मेळावे घेतले जाणार आहेत,
रत्नागिरी : केंद्र व राज्यातील सध्याचे भाजप सरकार जनहितविरोधात निर्णय घेत आहे, त्यामुळे जनतेत प्रक्षोभ आहे. त्यामुळे राज्यात अस्थितरता येऊ नये म्हणून धर्मनिरपेक्षता मानणारे पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात. कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या तुटलेल्या आघाडीबाबत योग्य निर्णय होऊ शकतो, असे संकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत दिले. राज्यातील पक्षसंघटना मजबूत करण्यासाठीच आपला हा राज्यव्यापी दौरा येथून सुरू केला आहे. संघटनात्मक बदल करून पुनर्रचना करावी लागणार आहे. कोकणच्या दौऱ्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा विभागाचा दौरा त्यानंतर राज्याच्या अन्य भागात दौरा करून मेळावे घेतले जाणार आहेत, असे ते म्हणाले.
एबी फॉर्म देऊनही ऐन विधानसभेच्या तोेंडावर उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला दगा दिला. त्यामुळे काही काळ पक्षात पोकळी निर्माण झाली. मात्र, आता ही पोकळी भरून काढण्याचे काम सुरू झाले आहे. बशीर मुर्तुझा, कुमार शेट्ये, रामभाऊ गराटे व अन्य पक्षनिष्ठ कार्यकर्ते कामाला लागले आहेत. जे पक्ष सोडून व्यक्तीनिष्ठेसाठी अन्य पक्षात गेले ते आता पस्तावले आहेत. त्यांच्यात अस्वस्थता असल्याची माहिती आपल्यापर्यंत आली आहे. त्यामुळे त्यांना खरोखरच त्या निर्णयाबाबत खंत वाटत असेल तर त्यांना पक्षात परतीचा मार्ग मोकळा आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून सध्या वादंग निर्माण झाला आहे. याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केले आहे. इतिहासातील आक्षेपार्ह लिखाणाला पवार यांचाही आक्षेप आहे. याबाबत पक्षाची भूमिका काय, असे विचारता तटकरे म्हणाले, पुरंदरे यांच्या आक्षेपार्ह लिखाणाबाबत जे पवार बोलले ती पक्षाचीच भूमिका आहे. पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. त्यामुळे आक्षेपार्ह लिखाण करून कोणी वाद निर्माण करावेत, हे योग्य नाही. त्याची खातरजमा होणे आवश्यक आहे.