‘थिंक टँक’चा कोकणच्या उपयोगाबाबत विचार : प्रभू
By admin | Published: August 31, 2014 12:25 AM2014-08-31T00:25:22+5:302014-08-31T00:29:46+5:30
मालवण : देशातील विविध मंत्रालयांच्या नवनवीन योजनांच्या अंमलबजावणीपूर्वी माहिती एकत्रित करून त्यावर ठोस निर्णय घ्यावा
मालवण : देशातील विविध मंत्रालयांच्या नवनवीन योजनांच्या अंमलबजावणीपूर्वी माहिती एकत्रित करून त्यावर ठोस निर्णय घ्यावा व नंतरच त्या योजना पंतप्रधानांकडे सादर केल्या जाव्यात यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ‘थिंक टँक’ची संकल्पना मांडली आहे. याद्वारे पुढील पंधरा वर्षांसाठी ५० लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असून, या ‘थिंक टँक’चा कोकणासाठी कसा उपयोग करता येईल याचा विचार आपण करीत आहोत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी येथे केले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरेश प्रभू हे मालवण या ठिकाणी आपल्या निवासस्थानी आले असता मनसेचे कोकण विभाग संघटक माजी आमदार परशुराम उपरकर, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार शिवराम दळवी, धीरज परब, नंदकिशोर सावंत व इतरांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी परशुराम उपरकर यांनी थिंक टँकच्या प्रमुखपदी सुरेश प्रभू यांची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार परशुराम उपरकर आणि शिवराम दळवी यांच्याशी चर्चा करताना प्रभू म्हणाले, नियोजन मंडळाच्या धर्तीवर ‘थिंक टँक’चे काम असणार असून, त्याच्या कामाचा आवाका मोठा आहे. देशात केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या नवनवीन योजनांची माहिती या ‘थिंक टँक’कडे येणार असून, त्यावर विचारविनिमय करूनच नंतर त्या योजना पंतप्रधानांकडे पाठविल्या जाणार आहेत. त्याव्यतिरिक्त केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय राखण्याच्या दृष्टीने ‘थिंक टँक’ काम करणार असून, केंद्र सरकारचे धोरण ठरविण्यात थिंक टँकमधील सदस्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. याशिवाय विकासाच्या दृष्टीने राज्यांसाठी कोणते धोरण वापरायचे याचाही निर्णय ‘थिंक टँक’ घेणार आहे, अशी माहिती देत प्रभू यांनी पुढील १५ वर्षांसाठी देशाच्या विकासाचे धोरण ठरविण्याच्या दृष्टीने ५० लाख कोटी रुपयांची तरतूद या ‘थिंक टँक’मध्ये केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपरकर यांच्यासमवेत मनसे मालवण तालुकाध्यक्ष नारायण कुबल, भिवा शिरोडकर, शिवा भोजणे व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)