विद्वत्तेची तहान भागवणारा झरा

By admin | Published: September 1, 2015 08:58 PM2015-09-01T20:58:15+5:302015-09-01T20:58:15+5:30

राज्यातील दुर्मीळ ग्रंथालयांपैकी एक : सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिरची १६५ वर्षांची परंपरा

Thirsty thirsty | विद्वत्तेची तहान भागवणारा झरा

विद्वत्तेची तहान भागवणारा झरा

Next

राजन वर्धन- सावंतवाडी  -आजच्या युगात एखाद्याची श्रीमंती पाहताना त्या व्यक्तीचे राहणीमान, आहार, पोशाख यावरून त्याची गणना केली जाते. पण खरे पाहता हीच मानवाची संपत्ती नसते. शरीराला लागणारी भूक ही उपरोक्त गोष्टीतून भागवली जाते. पण मनाला लागणारी भूक भागवण्यासाठी कोणत्याही अन्नाची अथवा कोणत्याही वैद्यकाची गरज नसते. गरज असते ती फक्त आपल्या सकारात्मक विचारांची, विद्वतेची आणि दूरदृष्टीची. मानवाची हीच मुख्य गरज ओळखून ती भागवण्याची कला जोपासली आहे सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील श्रीराम वाचन मंदिर या ग्रंथालयाने. जनजागृती, समाजप्रबोधनाचा हा व्रताविष्कार अखंड नंदादीपाप्रमाणे तेवत आहे. गेली १६५ वर्षे अविरत विद्वतेची, ज्ञानाची व संशोधनाची भूक भागवत कार्यरत असणारे श्रीराम वाचन मंदिर म्हणजे वैचारिक, तत्वज्ञ पर्यटकांची मांदियाळीच आहे. इंग्रज राजवटीपासून अविरत सुरू असलेल्या या ग्रंथालयात ऐतिहासिक वारसा लाभलेली ३०० च्या वर पुस्तके आहेत; जी राज्यातीलच नव्हे, तर देशातील जुन्या संशोधकांनी हाताळली आहेत व नवसंशोधकांनाही ती हाताळावयास मिळत आहेत.
श्रीराम वाचन मंदिराची स्थापना १८ एप्रिल १८५२ साली झाली. थोर समाजसुधारक लोकहितवादी यांच्या शतपत्रांतील तिसऱ्या पत्रात याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. सन १९३५ साली बापूसाहेब महाराज यांनी आपल्या वडिलांचे नाव देऊन ते ‘श्रीराम वाचन मंदिर’ असे केले.
हे वाचनालय सुरुवातीला काही मोजक्या ग्रंथ, पुस्तकांवर सुरू झाले होते. १८७७ ला ही संख्या १९०७ इतकी झाली. त्यामध्ये जगन्नाथ वागळे यांनी आपल्याकडील एक हजार पुस्तकांचा संग्रह, अब्दुल गनी शेख यांनी १९७७ ला ७६९ दुर्मीळ व मौलिक इंग्रजी ग्रंथ अर्पण केले. त्यातूनच या ग्रंथालयाची समृद्धता वाढली आणि संशोधनासाठीची अनेक कवाडे खुली झाली.
या वाचनालयातील दिली जाणारी आपुलकीची सेवा ही वाचन मंदिराचे कौशल्य आहे. यातील खुला वाचन विभाग, संदर्भ विभाग, महिला विभाग, बाल विभाग व साखळी योजना आदींतून ही सेवा सुरू आहे. खुल्या वाचन विभागात दररोज चारशे ते पाचशे, म्हणजे वर्षाकाठी सरासरी दीड लाखाच्यावर वाचक लाभ घेतात. महिला विभागात २० नियतकालिके असून, येथील महाविद्यालयातील विद्यार्थिनी याचा लाभ घेत आहेत. तर बालकांसाठी दूरदृष्टीचा विचार करून दहा नियतकालिके असून, शहराबरोबरच पंचक्रोशीतील बालकांनाही याचा लाभ मिळत आहे.
याशिवाय राजाराम मोहन रॉय साखळी योजनेतून या गं्रथालयामार्फत ग्रामीण
विभागातील ग्रंथालयांना पुस्तके पुरविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जात आहे.

विस्तारासाठी संधी आणि गरजही
देशातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा खजिना असलेल्या या वाचनालयाकडे अभ्यासकांचा कल वाढत असून, दुर्मीळ ग्रंथ, पुस्तकांची मागणी वाढत आहे. याबरोबर राज्यातील विविध महाविद्यालयांतून जिल्ह्यात येणाऱ्या अभ्यास भेटींसाठी ही दुर्मीळ पुस्तके मार्गदर्शक असल्याने त्यासाठी विशेष सभागृहाची गरज आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हे साकारण्यात येणार असून, जिल्ह्यातील तसेच राज्यातील राज्यसभा खासदारांचा निधी यासाठी मिळविण्याच्या दृष्टीने यशस्वी मार्गक्रमण सुरू आहे.
- जयानंद मठकर, माजी आमदार व विद्यमान अध्यक्ष, श्रीराम वाचन मंदिर

सावंतवाडीतील हे वाचनालय अमृतज्ञानाची खाण असून, राज्यातील भूषणावह असा अनमोल ठेवा आहे. कोकणातील पर्यटकांना नैसर्गिक ठिकाणांची भुरळ पडतेच; त्याचबरोबर सध्या या वाचनालयाचीही आस पर्यटकांना लागत आहे. ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या वाचनालयाला शासनाने भरीव मदत करून हा अनमोल ठेवा जतन करणे गरजेचे आहे.
- मंगेश तळवणेकर, सामाजिक कार्यकर्ते

अनेक पुरस्कारांनी गौरव
या वाचनालयातील महत्त्वपूर्ण विभाग म्हणून ओळखला जाणारा ‘संदर्भ विभाग’ जिल्ह्यासह राज्याच्या ऐतिहासिकतेत मानाची भर घालणारा ठरला आहे. या ग्रंथालयाच्या कामगिरीचा आढावा घेत राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय, गं्रथ मित्र पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथपाल असे अनेक पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तसेच अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे, संघटनांचे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

सुसज्ज आणि शोभनीय वास्तू
बहुतेक गं्रथालयांची जागा ही अपुरीच असते. जास्तीत जास्त पुस्तकांच्या कपाटांसह दहा-बारा खुर्च्या किंवा दोन-तीन टेबल बसण्याएवढी जागा म्हणजे खूप. पण श्रीराम वाचन मंदिराची २२५० चौरस फूट क्षेत्रफळाची इमारत एखाद्या मंदिरापेक्षाही मोठी आहे. राज्यातील ग्रंथालयांमधील ही बाब बहुतेक दुर्मीळच मानावी लागेल.

Web Title: Thirsty thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.