गोरिलासदृश प्राण्याचे थरारनाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2015 09:30 PM2015-04-15T21:30:30+5:302015-04-15T23:56:03+5:30
नेरूरमधील नागरिकांमध्ये भीती : घरावर उड्या मारल्याने छपराचे नुकसान
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर मेस्त्रीवाडी येथील महादेव मेस्त्री यांच्या घरावर गोरिलासदृश प्राण्यांनी उड्या मारत नुकसान केले. या प्राण्यांनी घराची कौले आणि पत्रे फोडून टाकले. दहा मिनिटे चाललेल्या या थरारामुळे घरातील व्यक्तींसह ग्रामस्थ भयभीत झाले असून, हे गोरिलासदृश केसाळ प्राणी बाजूच्याच जंगलात पळून गेले आहेत.
नेरूर- मेस्त्रीवाडी येथील महादेव मेस्त्री यांच्या घराच्या छप्परावर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास केसाळ पाच ते सहा फूट उंची असलेल्या गोरिलासदृश माकडासारख्या दोन प्राण्यांनी उड्या टाकल्या. त्यामुळे घरावरील कौले व अंगणातील पत्रे खाली आले. सकाळच्या सुमारास मेस्त्री यांच्या घरातील महिला घरातून बाहेर पडताच हा गोरिलासदृश प्राणी पिल्लासह समोर आढळून आला. दरवाजा उघडला जाताच त्या प्राण्यांनी त्यांच्या अंगणातील छपरावर उडी घेतली असता, त्यातील एका प्राण्याचा पाय तिथे अडकला. त्यामुळे घाबरलेल्या त्या दोन्ही प्राण्यांनी कसाबसा पाय सोडवून सुटका केली आणि त्यानंतर पुन्हा घराच्या छपरावर उड्या घेतल्या.
छपरावर या प्राण्यांनी उडी मारली. मात्र, या प्राण्यांचे वजन खूप असल्याने उडी मारलेल्या ठिकाणी छपराचा भाग तुटला. हे प्राणी घरावर उड्या मारीत असताना जोरदार आवाज करत होते. याठिकाणी आलेल्या या दोन प्राण्यांपैकी एक प्राणी मोठा तर एक छोटा होता. लहान असलेला प्राणी बहुधा पिल्लू असण्याची शक्यता मेस्त्री कुटुंबीयांनी
वर्तविली. (प्रतिनिधी)
अशा प्राण्यांची नोंद नाही : वनविभाग
नेरूरमध्ये आलेले ते प्राणी गोरिलासदृश असले तरी आपल्या जिल्ह्यात गोरीला किंंवा चिपांझी प्राणी असल्याची वन विभागाकडे नोंद नाही. तरीही योग्य पद्धतीने तपास करू, अशी माहिती वनविभागाने दिली. तसेच या प्राण्यांनी उड्या मारताना त्यांचे केस ठिकठिकाणी पडलेले आढळून आले. ते केस तपासणीकरिता पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचेही वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
आक्राळविक्राळ प्राणी
हे प्राणी उंच आणि आक्राळविक्राळ व केसाळ होते. ते गोरीला, चिपांझीसारखे दिसत असल्याचीही माहिती मेस्त्री कुटुंबीयांनी दिली.
नेरूरमध्ये आलेल्या या दोन्ही प्राण्यांमुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमका कोण प्राणी आहे, याची माहिती व ओळख नसल्याने ग्रामस्थांमध्ये दिवसभर याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत होत्या.