हा तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका

By सुधीर राणे | Published: May 2, 2023 03:26 PM2023-05-02T15:26:38+5:302023-05-02T15:27:02+5:30

सभेत नेहमीप्रमाणेच आगपाखड, टोमणे, मत्सर पहायला मिळाला

This is Thackeray attempt to ride the wave of sympathy, Praveen Darekar criticism | हा तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका

हा तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका

googlenewsNext

कणकवली: महाविकास आघाडीची मुंबई येथे झालेली वज्रमूठ सभा म्हणजे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचे आव्हान परतवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. तसेच भावनिक वातावरण तयार करून सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन मते मिळविण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असल्याची टीका विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. 

कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत उपस्थित होते.

प्रवीण दरेकर म्हणाले, या सभेत नेहमीप्रमाणेच आगपाखड, टोमणे, मत्सर पहायला मिळाला. या सभेत काही मुद्यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला.पण त्याबाबतची वस्तूस्थितीही पाहणे आवश्यक आहे. मुंबई वेगळी करून महाराष्ट्राचा लचका तोडायचा प्रयत्न केला जात आहे असे वक्तव्य करण्यात आले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सांगितले आहे की, भावनिक वातावरण तयार करून मते मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  यापूर्वीच जाहीर इशारा दिला आहे की, मुंबई  महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्याही बापात नाही. तसे कोणी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला माफ केले जाणार नाही. पण, काहीही वक्तव्ये करून उद्धव ठाकरे यांचा सहानुभूतीच्या लाटेवर स्वार व्हायचा प्रयत्न आहे. तो यशस्वी होणार नाही.

 मुंबईतील ठेवी जशा त्यांच्या बापाच्या नाहीत, तशाच त्या आमच्या बापाच्याही नाहीत. त्या मुंबईकरांच्या ठेवी असून त्यांना सुविधा पुरविण्यासाठीच महापालिकेच्या माध्यमातून त्याचा वापर व्हायला हवा. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शालेय अभ्यासक्रमात श्रीमंत कसे व्हायचे याबाबत अदानींच्या आत्मचरित्राचा धडा असायला हवा, असे सांगितले. मात्र, उद्धव ठाकरे यांचा स्वतःचा काहीही उद्योग नसताना एका मातोश्रीच्या दोन इमारती कशा झाल्या. याबाबत त्यांनी आपल्या वर्तमानपत्रातून लेख प्रसिद्ध करावा. म्हणजे झेंडा नाचवणाऱ्या शिवसैनिकांना श्रीमंत कसे व्हायचे? हे समजेल. 

सध्याचे राज्यातील सरकार भक्कम आहे. त्याला कोणताही धोका नाही.हे विकासाभिमुख सरकार आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांना साक्षात्कार झाला आहे ,की हे सरकार पडणार आहे. त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. राज्य सरकार मध्ये चांगला समन्वय आहे. महाविकास आघाडीत तो नाही. राज्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.कोकणचा विकास व्हायचा असेल तर पर्यावरणाची हानी होणार नाही,असे प्रकल्प येथे यायला हवेत.त्यासाठी भाजपचा प्रयत्न असेल.

बारसूच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भूमिका आहे. त्याबाबत त्यानी जनतेसमोर आधी आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी. 

मुख्यमंत्री असताना कोकणच्या विकासासाठी काय केले?

बारसू येथे येणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री असताना कोकणच्या विकासासाठी काय केले?ते जाहीरपणे जनतेला सांगावे. आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडावा.असेही प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले.

शरद पवारांना अनेक गोष्टी पचनी पडत नाहीत!

शरद पवार हे एक जाणते नेते आहेत. विकासासाठी असलेली त्यांची तळमळ नेहमीच दिसून येते. त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. समाजातील अनेक गोष्टी त्यांच्या पचनी पडत नाहीत. मात्र, कालांतराने त्यातील एक एक गोष्ट पुढे येतील.असेही प्रवीण दरेकर भाजप-राष्ट्रवादी यांच्या राज्यातील सरकारबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान म्हणाले.

Web Title: This is Thackeray attempt to ride the wave of sympathy, Praveen Darekar criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.