"गणेशोत्सव सणात हे राजकारण योग्य नाही"; केसरकरांचा आदित्य ठाकरेंना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 02:07 PM2023-09-21T14:07:42+5:302023-09-21T14:09:32+5:30
गणेशोत्स्वानिमित्ताने कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि नेतेमंडळींच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेण्याच प्रथा मुंबईत व कोकणात आहे
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात बाप्पांचे जोरदार स्वागत झाले असून पुढील १० दिवस उत्सव, जल्लोष आणि भावभक्तीचं वातावरण असणार आहे. बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांची सोशल इंजिनिअरींगही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येते. कोकणात गणेशोत्सवाचे वेगळेच महत्त्व आहे. कोकणवासी गणपतीच्या सणासाठी दरवर्षी गावी जातात. तर, राजकीय नेतेही मतदारसंघात हजर असतात. मंत्री दीपक केसरकर हेही मतदारसंघात आले आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेही सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत.
गणेशोत्स्वानिमित्ताने कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि नेतेमंडळींच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेण्याच प्रथा मुंबईत व कोकणात आहे. या माध्यमातून जनसंपर्क साधला जातो. आदित्य ठाकरे आजपासून कोकण दौऱ्यावर असून सिंधुदुर्गात ते शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मंडळाला व घरातील बाप्पांच्या दर्शनासाठी भेटी देत आहेत. मात्र, या माध्यमातून राजकारण होत असल्याचं आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय. तसेच, आदित्य ठाकरेंना एका सल्लाही दिला आहे.
आदित्य ठाकरेंनी, आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं, गणरायाचं दर्शन घ्यावं. परंतु, आपल्या पक्षात नसलेल्या लोकांवर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मला अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले, काय करायचं, असं विचारले. मी कार्यकर्त्यांना सांगितलं, अवश्य त्यांना तुमच्या घरी येऊ द्या, पण तुम्ही तुमच्या मताशी ठाम राहा.
गणपती सारख्या एका चांगल्या प्रसंगात असा प्रयत्न करणं कितपत योग्य आहे?, असा सवाल दीपक केसरकर यांनी केला आहे. तसेच, सणांचं जे महत्त्व असतं, त्याचं पावित्र्य असतं, त्यामध्ये कधीही राजकारण येता कामा नये, असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे, त्यांचं स्वागत करतानाच, आदित्य ठाकरेंनी त्यांच्या जीवनात ही काळजी घेणंही आवश्यक आहे, असा सल्लाही केसरकर यांनी यावेळी दिली.