यंदा सहा वर्षांची मुले पहिलीत दाखल होणार
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 17, 2024 03:05 PM2024-04-17T15:05:21+5:302024-04-17T15:05:52+5:30
प्रवेश देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर
सिंधुदुर्ग : शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण अनिवार्य केले आहे. विद्यार्थ्यांवर अधिक तपाण येऊ नये, यासाठी ३१ डिसेंबर २०२४ रोजी सहा वर्षे पूर्ण होणारी बालके यंदा इयत्ता पहिलीत दाखल करण्यात येणार आहेत. सहा वर्षे पूर्ण असणार्या अशा बालकांना सक्तीपात्र तथा दाखलपात्र म्हणून समजण्यात येणार आहे.
आरटीईनुसार शाळेत दाखल करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे.
विद्यार्थ्यांनी कमी वयात शाळेत प्रवेश केल्यास त्यांच्यावर अभ्यासाचा अधिक ताण येत असून मुलांचा शैक्षणिक, सर्वांगीण विकास होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहतात. त्यामुळे केंद्र सरकारने शैक्षणिक सत्र २०२४ २५ या वर्षासाठी इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे पूर्ण होणे अपेक्षित आहे.
प्रवेशाचे वय आणि वर्ग
वर्ग वय
नर्सरी ३ वर्षे पूर्ण
ज्युनिअर केजी ४ वर्षे पूर्ण
सिनिअर केजी ५ वर्षे पूर्ण
इयत्ता पहिली ६ वर्षे पूर्ण
नोकरीत लवकर संधी
आता खासगी असो की शासकीय शाळांत सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाच पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे पूर्ण नाही, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. कमी वयात पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीत संधी लवकर मिळते. तसेच नोकरीचा कालावधीही जास्त मिळतो.
नर्सरीत कधी प्रवेश
- कमी वयात शाळेत मिळणार्या प्रवेशाला आता चाप बसणार आहे. मूल अडीच वर्षांचे झाल्यास लगेच पालकांना नर्सरी वर्गासाठी शाळेचे वेध लागतात.
- त्यानुसार खासगी, तसेच शासकीय शाळेत मुलांना प्रवेश दिला जात असे. मात्र, आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत तीन वर्षे पूर्ण होणार्या मुलांना नर्सरी वर्गासाठी शाळेत प्रवेश मिळणार आहे.
कोणत्या मुलांचा समावेश
या पार्श्वभूमीवर आता आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देताना सर्व शाळांना १ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ या काळात जन्मलेल्या मुलांनाच इयत्ता पहिलीत प्रवेश देता येणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडू् सांगण्यात आले