‘त्या’ काळ्या तेलाचे धागेदोरे गोव्यापर्यंत
By Admin | Published: May 29, 2014 12:40 AM2014-05-29T00:40:39+5:302014-05-29T00:40:51+5:30
किनारा प्रदूषित : शोध घेण्याची गरज
देवगड : देवगड समुद्रकिनारी वहात आलेल्या डांबरसदृश काळ्या तेलाच्या प्रदूषणाचे धागेदोरे गोव्यामध्ये गुंतले असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेले दोन दिवस मार्मा गोवा व पेडणे समुद्रकिनारीसुद्धा असेच प्रदूषणकारी तेलाचे तवंग वाळूवर पसरलेले आढळून आले आहेत. मोर्जिस समुद्र किनारा पेडणे व मार्मागोवामधील बायणा बीचवर हे दृष्य दिसत आहे. याचा संदर्भ गोव्यामध्ये काही दिवसांपूर्वी एका मालवाहू जहाजावरील टाकाऊ तेलाचा साठा गुजरातकडे अवैधरित्या नेला जात असताना किंवा तो भर समुद्रात अवैधरित्या सोडून दिला जाण्याकडे आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोव्याच्या काही इंग्रजी वृत्तपत्रामध्ये व मराठी दैनिकांमध्येही प्रतिभा शिपिंग कंपनीच्या एम टी ‘प्रतिभा भीमा’ या मालवाहू जहाजावर असलेल्या ४५० टन टाकाऊ तेलसाठ्याबाबत व त्याच्या वाहतुकीसंदर्भात समस्येबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यातील माहितीनुसार प्रतिभा भीमा हे मालवाहू जहाज ज्या कंपनीने लिलावात विकत घेतले, त्यांना गोवा टुरिझम संचालकांनी हे जहाज गुजरातकडे नेण्यापूर्वी त्यातील टाकाऊ तेलाचा साठा पणजी बंदरातच उतरवून घेऊन तो नष्ट करावा. त्यासाठी जलमार्गाचा वापर करू नये असे आदेश दिले होते. त्यासाठी गोवा बंदराचे कॅप्टन (मुख्य अधिकारी) यांची मदत घेऊन योग्य यंत्रणेच्या सहाय्याने तेलाची विल्हेवाट लावावी असे स्पष्ट केले होते. मात्र, काही कारणांमुळे या सर्व प्रकरणामध्ये काही वाद व तिढे उत्पन्न होऊन हे जहाज त्यातील टाकाऊ तेलाच्या साठ्यासह अवैधरित्या गुजरातकडे वळविण्यात आले. या प्रकरणात ४५० टन टाकाऊ तेल तसेच कोणत्याही वैध कागदपत्रे किंवा परवानगीशिवाय गुजरातकडे समुद्रमार्गे वळविण्यात आले. ही घटना मे मध्यातील आहे. जहाजावर साठ्यासह जलवाहतूक करण्याची कोणतीही क्षमता नसतानाही तसे झाल्यामुळे भर समुद्रात जहाज हिंदकळत असताना किंवा हेलकावे खाताना बरेचसे तेल समुद्रात वाहून गेल्याची शक्यता तेथील यंत्रणा वर्तवित आहेत. त्यामुळे प्रथम दक्षिणेस मार्मागोवा व त्याच्या थोडे उत्तरेस पेडणे व आता देवगड बंदरातही याच प्रकारच्या प्रदूषणकारी चिकट तेलाचे तवंग दिसून आले आहेत. या सर्व प्रदूषणासाठी हेच अवैध प्रकार कारणीभूत असल्याचेही मत ज्येष्ठ मच्छिमारांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)