नांदोस येथील 'ती' कुटुंबे बहिष्कृत नाहीत
By admin | Published: April 5, 2016 12:44 AM2016-04-05T00:44:53+5:302016-04-05T00:44:53+5:30
पोलिस निरीक्षकांनी वादावर पडदा टाकला
मालवण : मालवण तालुक्यातील नांदोस गावात काही कुटुंबे बहिष्कृत करण्यात आल्याची तक्रार नांदोस सरपंच व अन्य ग्रामस्थांनी मालवण पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाची मालवण पोलिस प्रशासनाने दखल घेत पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी नांदोस गावात जाऊन दोन्ही बाजूकडील वस्तुस्थिती जाणून घेत दोघांच्यात समन्वय साधून 'ती' कुटुंबे बहिष्कृत नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, काही वषार्पूर्वी निवडणुकीत झालेल्या वादामुळे 'त्या' गावातील दोन्ही बाजूंकडून ग्रामस्थांत फूट पडली होती, ही बाब समोर आली. गावात वाद आहेत असे चित्र निर्माण करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येउन एकोपा दाखवूया, असे आवाहन पोलिस निरीक्षकांनी केल्यानंतर गावातील मंदिरात सर्व कुटुंबे एकत्र आली.
पेढे वाटून आनंद साजरा
गावात एकोपा नांदावा यासाठी पोलिस निरीक्षक पाटील यांनी पुढाकार घेत दोन्ही गटांतील कथित वाद मिटविला. कट्टा पोलिस दूरक्षेत्राचे अंमलदार यु. जे. आंबेरकर यांनी गावात काही कुटुंबे बहिष्कृत झाली हे आभासी चित्र आता यापुढेही दिसणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सर्व कुटुंबीयांनी एकत्र येत पेढे वाटून आनंद साजरा केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)