जिल्ह्यातील त्या हत्यांचा तपास करण्यात यावा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 06:35 PM2020-08-14T18:35:50+5:302020-08-14T18:39:15+5:30
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना पक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने टाहो फोडणारे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे त्यांचे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या खुनाबद्दल अद्यापही मौन बाळगून का आहेत? असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
कुडाळ : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना पक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने टाहो फोडणारे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे त्यांचे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या खुनाबद्दल अद्यापही मौन बाळगून का आहेत? असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २००२ पासून रमेश गोवेकर, अंकुश राणे व रमेश मणचेकर या चार जणांच्या हत्यांचा तपास पुन्हा एकदा सुरू करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी तालुकाप्रमुख संतोष शिरसाट, युवा सेनाप्रमुख मंदार शिरसाट, माजी उपसभापती श्रेया परब तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, मागील काही दिवसांपासून भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे व त्यांचे पुत्र हे सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी शिवसेना पक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने टाहो फोडत आहेत.
खरेतर सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी भूमिका राज्य सरकारची आहे. या प्रकरणी राज्य सरकार उच्च न्यायालयात गेले आहे. असे असतानाही केंद्र सरकारने राज्य सरकारला न विचारता सीबीआय चौकशी लावून सीबीआयचा दुरुपयोग केला, असा आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला.
राणे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, राणे यांनी सुशांतसिंह यांच्या मृत्यूप्रकरणी जेवढी तत्परतेने पत्रकार परिषद घेतली आणि जे आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. त्याची सत्यता सर्व चौकशीअंती बाहेरच येईलच. मात्र, त्यांचा सख्खा चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या हत्येबाबत राणे यांनी कधीच एकही शब्द का काढला नाही? याबाबत जिल्ह्यातील जनतेला चांगलेच माहीत आहे.
या जिल्ह्यात २००२ पासून झालेले रमेश गोवेकर, अंकुश राणे, रमेश मणचेकर या चारही जणांच्या हत्येचा संपूर्ण तपास पुन्हा सुरू करून या प्रकरणातील आरोपी तसेच यामागचे खरे सूत्रधार यांना अटक करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असल्याचेही राऊत म्हणाले.
पुढील पाच वर्षे स्थिर सरकार
कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविल्यानंतर शिवप्रेमींनी याबाबत आंदोलन सुरू केले. त्यामुळे कर्नाटक सरकारने पुन्हा पुतळा बसविण्याचे आश्वासन दिले. मात्र, मराठा समाजाचे नेते म्हणविणारे राणे व आमदार नीतेश राणे हे याबाबत काहीच बोलले नाहीत. कारण कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे आणि जर हे बोलले तर यांना भाजप वाळीत टाकेल हे त्यांना माहीत आहे. म्हणून ते बोलले नाहीत, असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला.
या जिल्ह्यात २००२ पासून रमेश गोवेकर, अंकुश राणे, रमेश मणचेकर या चार हत्या झाल्या. यावेळी राणे पालकमंत्री व मंत्री होते. मात्र, या चारही हत्यांचा तपास अजूनही लागला नाही. एकाही आरोपीला अटक केली नाही. याबाबत राणे केव्हाच काही बोलताना दिसले नाहीत.