‘त्या’ गाळ्यांचे भंगार २२ हजारांना विकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 06:25 PM2018-09-07T18:25:05+5:302018-09-07T18:26:08+5:30
वेंगुर्ले नगरपरिषद बैठक : नगरसेवकांकडून नगराध्यक्ष धारेवर
वेंगुर्ले : वेंगुर्ले मच्छिमार्केटसाठी तोडण्यात आलेल्या त्या गाळ्यांचे लाखमोलाचे भंगार सामान फक्त २२ हजार रुपयांना विकण्यात आल्याने गुरूवारच्या मासिक सभेत नगरसेवकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना धारेवर धरले. तर भंगारात दिलेले सामान घेऊन त्याचा परत लिलाव करण्यात यावा, असा ठराव करण्यात आला.
वेंगुर्ले नगरपरिषदेची सभा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्थायी सभेत झालेले निर्णय हे मासिक बैठकीसमोर ठेवणे बंधनकारक असताना गुरूवारच्या सभेत स्थायी समिती इतिवृताचे वाचन हा विषय का ठेवण्यात आला नाही, असा प्रश्न नगरसेवक तुषार सापळे यांनी उपस्थित केला. त्यावर विधाता सावंत, शीतल आंगचेकर, संदेश निकम, आत्माराम सोकटे, शैलेश गावडे, प्रकाश डिचोलकर यांनी या विषयाला दुजोरा दिला व प्रशासनास स्थायी समितीमधील विषय वाचून दाखवण्यास भाग पाडले व त्या २५ विषयांवर चर्चा करण्यात आली. तर अद्ययावत मच्छिमार्केटसाठी त्या तोडण्यात आलेल्या गाळ्यांचे सामान फक्त २२ हजार किंमतीत विकल्याने हे भंगार परत घेऊन त्याचा लिलाव करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली व तसा ठराव घेण्यात आला. तर उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी राऊळवाडा येथील कॉम्प्लेक्समधील सांडपाणी येथील बागेमध्ये सोडण्यात येते. याविषयी वारंवार तक्रार करूनही त्या कॉम्प्लेक्सवर कार्यवाही झाली नसल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त करत या प्रश्नी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
हॉस्पिटल नाका येथील सध्या बंद स्थितीत असलेले सेंट लुक्स हॉस्पिटल पुनर्जीवित करण्यात यावे या संदर्भात नगराध्यक्ष यांना कळविण्यात आले असता हे हॉस्पिटल राज्य शासनाने आपल्या ताब्यात घेऊन ते वेंगुर्ले नगरपरिषदेकडे चालविण्यास द्यावे व त्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य राज्य शासनाने करावे, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला.
गळकी गाडी आढळल्यास कारवाई करा
नगरसेविका शितल आंगचेकर यांनी नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांवर मासे वाहतूक करणाऱ्या गाड्यांतून पडणाऱ्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. अशा गळक्या गाड्यांतून मासे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली. यावर मुख्याधिकारी यांनी मासे वाहतूक करणारी अशी गळकी गाडी आढळल्यास त्यावर त्वरीत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.