रक्षण करणाऱ्यांचेच राहणीमान असुरक्षित

By admin | Published: July 31, 2016 12:31 AM2016-07-31T00:31:44+5:302016-07-31T00:31:44+5:30

कुडाळ पोलिस वसाहत मोजतेय अंतिम घटका : पोलिसांचा रहिवास धोक्यात

Those who protect themselves are insecure | रक्षण करणाऱ्यांचेच राहणीमान असुरक्षित

रक्षण करणाऱ्यांचेच राहणीमान असुरक्षित

Next

रजनीकांत कदम / कुडाळ
सर्वसामान्यांना संरक्षण देऊन सुखी व सुरक्षीत जीवनासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या पोलिसांचे शांततामय सहजीवन व कायदा आणि सुव्यवस्था राहण्यात पोलिस प्रशासनाचा मुख्य वाटा आहे. पण दुसऱ्यांना सुरक्षा पुरवणाऱ्या पोलिसांचीच सुरक्षीतता धोक्यात आली तर याहून गंभीर ती कोणती गोष्ट असेल. पण ही वास्तव अवस्था आहे कुडाळ पोलिसांची. पोलिसांच्या रहीवासासाठी असणाऱ्या वसाहतीतील खोल्या पूर्णत: मोडकळीस आल्या आहेत. दिवसेंदिवस धोकादायक बनत असलेल्या या इमारतीला नुतनकरणाची प्रतिक्षा लागून आहे.
दरम्यान, येथील अनेक पोलीसांसह नव्याने दाखल होणाऱ्या पोलीसांना शहरात भाड्याची खोली मिळाली नाही, तर याच धोकादायक वसाहतीत जीव मुठीत धरून पोलिस व त्यांचे कुटूंब राहत असल्याचे भिषण वास्तव येथे पाहावयास मिळते.
कुडाळ पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी १८ खोल्यांची वसाहत ७० ते ८० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आहे. तर दुसरी नवी वसाहत सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. या नव्या वसाहतीत १२ खोल्या आहेत. या वसाहती बांधून अनेक वर्षे झाली, तरी या वसाहतीच्या नूतनीकरणासाठी शासनाने कोणतीच ठोस उपाययोजना आतापर्यंत केली नाही. त्यामुळे ही वसाहत गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक बनत चालली आहे.
या पोलिस वसाहतीच्या दुरूस्तीकडे वेळच्यावेळी गांर्भियाने लक्ष न दिल्याने वसाहत असुरक्षित बनली आहे. या वसाहतीतील काही खोल्यांच्या भिंती ढासळल्या असून कित्येक खोल्यांचे छप्परही पडत आहे. दरवाजे-खिडक्याही तुटून पडल्या आहेत. त्यामुळे ही वसाहत असून अडचण आणि नसून खोळंबा याप्रमाणे अडगळीत सापडली आहे.
शिवाय, वसाहतीच्या खोल्यांचे लाकडी सामानही खराब झाल्यामुळे उरले सुरले छप्पर केव्हाही कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. दरम्यान, वारंवार कोसळणाऱ्या छप्परामुळे या इमारतीची कौलेही कोसळून फुटत आहेत. उरले सुरले दरवाजे, खिडक्याही दुरूस्ती अभावी खराब होत आहेत. तर या वसाहतीसाठी पाण्याची मुख्य संजीवनी असणाऱ्या नळपाणी योजनेचीही अवस्था वेगळी नाही. बहुतांशी नळ केवळ दिखाव्यासाठीच उभे आहेत. तर स्वच्छतेसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या गटारांचा प्रश्नही कायम आहे, परिणामी सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने वसाहती परिसरात दुर्गंधी पसरत असून रोगराई पसरण्याची भितीही निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता पोलिस स्थानकाच्या शेजारीच पोलिस कर्मचारी राहणे आवश्यक असताना येथील वसाहतीच्या दुरवस्थेमुळे कुडाळ पोलिसांची गैरसोय होत आहे. परिणामी कार्यवाहीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. एखाद्या गंभीर प्रकरणावेळी पोलिस फौजफाट्याची गरज असली तर वसाहतीअभावी बाहेर राहणाऱ्या पोलिसांना ठिकठिकाणावरून येताना नाहक त्रास सहन करावा लागतो.
दरम्यान, कुडाळ पोलिस स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात जागा असून, या ठिकाणी असलेल्या वसाहतीला पर्यायी इमारत या जागेवर सहज उभारू शकते. जर नवीन इमारत झाली तर पोलीसांची गैरसोय दुरू होऊन कर्तव्यात कसूर होणार नाही, ही मानसिकता वरिष्ठांनी समजून घेण्याची गरज आहे.

Web Title: Those who protect themselves are insecure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.