‘त्या’ शिक्षणसेवकांना कायम करणार
By admin | Published: December 12, 2014 10:39 PM2014-12-12T22:39:17+5:302014-12-12T23:35:42+5:30
विनोद तावडे : रत्नागिरीसह पाच जिल्ह्यातील १९२ शिक्षणसेवकांचे भवितव्य टांगणीला
रत्नागिरी : कोणत्याही अतिरिक्त शिक्षकाला सेवेला मुकावे लागणार नाही. कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यांतील १९२ शिक्षणसेवकांना सेवेत कायम करण्याचे धोरण असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. शिक्षण संस्था, चालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागातील पाचही जिल्ह्यांतील संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी आयोजित केलेल्या बैठकीत तावडे यांनी संघटना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. तसेच शासकीय धोरणेही स्पष्ट केली.
चालू शैक्षणिक वर्षातील (२०१४-१५) संचमान्यता जानेवारीच्या मध्यापर्यत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच आरटीईअंतर्गत शिक्षक मंजुरीमुळे निर्माण झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न, त्यांच्या समावेशनाबाबतचे नियोजन, कायम शिक्षकांचे आॅनलाईन आणि अतिरिक्त शिक्षकांचे आॅफलाईन वेतन, शिक्षकेतरांचा आकृतीबंध व त्याची अंमलबजावणी याबाबत शिक्षणमंत्री तावडे यांनी आपले मत व्यक्त केले.
शिक्षण संस्थांतून चालणाऱ्या गैरकारभाराविषयी तावडे यांनी काही शिक्षण संस्था चालक शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरकारभार करतात. हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्या कमी संख्येने या संस्था आहेत. मात्र, त्यामुळे सर्वच शिक्षण संस्थांना बदनामीस सामोरे जावे लागते. जनतेच्या पैशावर संस्था चालवित असल्याचे भान ठेवून गैरव्यवहार खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला.
सेवानिवृत्ती वेतन मंजूर झाल्या नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असून जिल्हा व विभागीय प्रश्नासाठी यापुढे शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करावी लागणार नाही. ते प्रश्न त्या ठिकाणीच सोडविण्याच्या पध्दतीचे प्रशासन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून शिक्षक संघटनांनीही आपले हेवेदावे बाजूला ठेवून काम केल्यास प्रश्न सुटण्यास मदत होईल.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष भारत घुले, कार्यवाह अशोक आलमान, जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाळ मोरे, शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, राम पाटील, बी. डी. पाटील यांच्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)े
राज्यात शिक्षणसेवकांना सेवेत कायम करण्याचा प्रश्न गाजत असताना माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर तावडे यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची ग्वाही दिली.