राज्यकर्ते बदलले तरी समस्या ‘जैसे थे’
By admin | Published: June 25, 2015 12:58 AM2015-06-25T00:58:34+5:302015-06-25T00:58:50+5:30
राज ठाकरेंचा टोला : मच्छिमारांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न
देवगड : राज्य शासनाची इच्छाशक्ती प्रबळ नसल्याने विकासकामे करू शकत नाहीत. त्यांच्या या नाकर्तेपणामुळे राज्यकर्ते बदलले तरी जनतेच्या मागण्या व जनतेच्या समस्या अजूनही तडीस गेल्या नाहीत. कोकण किनारपट्टीवर परराज्यांतील पर्सनेट मच्छिमार घुसखोरी करून मच्छिमारी करीत आहेत. माझ्या पक्षाकडे एकहाती सत्ता द्या, परराज्यांतील मच्छिमारांची कोकण किनारपट्टीवर येण्याची हिंमतच होणार नाही, अशी ठाम ग्वाही मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिली.
राज ठाकरे यांनी देवगड येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसे कामगार सेना सरचिटणीस शरद सावंत, मनसे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर, कोकण संघटक परशुराम उपरकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष चेतन कदम, ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष सुधीर जाधव, जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यावेळी उपस्थित होते.
जिल्हा दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी कुणकेश्वर मंदिराला भेट देऊन श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्ट व कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालय येथे भेट दिली. यावेळी मनविसेच्यावतीने त्यांचे कॉलेज प्रवेशद्वार येथे स्वागत करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळ देवगडच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिक्षण प्रसारक मंडळ देवगडचे कार्यवाह प्रसाद पारकर यांनी या महाविद्यालयाच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन राज ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जनार्दन तेली, सहकार्यवाह प्रमोद नलावडे, संचालक चंद्रकांत पाळेकर, अमोल जामसंडेकर, आदी उपस्थित होते.
देवगड तालुक्यात एकमेव वरिष्ठ महाविद्यालय असून, या महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातून प्रवेशासाठी अनेक विद्यार्थी येत असतात. मुंबई विद्यापीठाची विद्यार्थी संख्येची अट असल्याने काही विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत प्रवेश मिळत नाही. यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थी संख्या वाढवून मिळावी, अशी मागणी अमोल जामसंडेकर यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली.
देवगड तालुक्यातील मच्छिमार संघटनेचे नेते भाई खोबरेकर, चंद्रकांत पाळेकर, जगन्नाथ कोयंडे, द्विजकांत कोयंडे, ज्ञानेश्वर खवळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन मच्छिमारांच्या समस्या मांडल्या.
आंबा बागायतदारांच्यावतीने सुधीर जोशी यांनी आंब्याला हमीभाव मिळावा, आंबा विक्री केंद्र सुरू करण्यात यावे, आंबा पीक कर्जावरील व्याज माफ करावे या प्रमुख मागण्या राज ठाकरे यांच्याकडे केल्या.
पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, माझा संपूर्ण कोकण दौरा हा पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून असून, जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याकडे भर देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष संघटनेला भरारी घेण्यासाठी कार्यकर्त्यांशी हितगूज करून त्यांना मार्गदर्शन करून पक्ष संघटना वाढीसाठी माझे प्रयत्न असणार आहेत. (प्रतिनिधी)
राज ठाकरे-नारायण राणे भेट
कणकवलीतील नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे यांनी ओम गणेश बंगल्यावर दाखल झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. तेथे उभयतात जवळपास पंधरा मिनिटे चर्चा झाली. यावेळी आमदार नीतेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. चहापान झाल्यानंतर राज ठाकरे हे बंगल्यावरून निघाले.