अंबाबाईच्या गोंधळाला हजारोंचा ‘उदो उदो’

By admin | Published: May 20, 2015 10:14 PM2015-05-20T22:14:06+5:302015-05-21T00:05:28+5:30

अनेक वर्षांची परंपरा : अख्खा गाव अन् भक्त रात्रभर जागतो...

Thousands of 'Ambush' | अंबाबाईच्या गोंधळाला हजारोंचा ‘उदो उदो’

अंबाबाईच्या गोंधळाला हजारोंचा ‘उदो उदो’

Next

चिपळूण : उदो गं... अंबाबाई उदो गं... अंबाबाई... अंबाबाईच्या नावाने उदो... उदो... अशी आर्त हाक गोंधळी मनापासून घालतो आणि अंबेला विनवणी करतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने गोंधळास सुरुवात होते. ग्रामीण भागात आजही ही प्रथा आणि परंपरा मोठ्या उत्साहाने जोपासली जात आहे. ग्रामीण भागात लग्नानंतर किंवा पांजीचा म्हणून गोंधळ घालण्याची परंपरा आजही जोपासली जाते. गोंधळ घातला नाही तर जीवनाचा गोंधळ होतो, असा एक समज असल्याने गोंधळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीनंतर गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. गावोगावी गोंधळ्यांना मोठी मागणी असते. परंतु, काही गोंधळ्यांची ठराविक गावांशी बांधिलकी असते. त्यामुळे त्याच गोंधळ्याला सन्मानाने आणले जाते. त्याला काही अडचण असेल तर त्याच्या परवानगी किंवा त्याने दिलेला दुसरा सहकारी स्वीकारला जातो. देवाच्या नावाने हा गोंधळ सुरु करण्यापूर्वी गावात जोगवा मागितला जातो. त्यानंतर कवड्याची माळ गळ्यात घालून विधिवत मांड भरला जातो. सायंकाळच्या वेळी यजमान दिवटी पाजळतो. यावेळी अंबाबाईच्या नावाचा उदो उदो केला जातो. गोंधळी पहाडी आवाजात पंचक्रोशीतील ग्रामदेवतांना व देवदेवतांना गोंधळासाठी आवाहन करतो.
प्रथेनुसार यजमान व त्याचे सहकारी या गोंधळात सहभागी होतात. त्यानुसार त्याची बिदागी ठरलेली असते. ठराविक कुटुंबापेक्षा जास्त दिवट्या पेटल्या, तर त्यासाठी वेगळे मानधन आकारले जाते.
एकूणच गोंधळ्यांसाठी हा काळ पर्वणीचा असतो. नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असणारे गोंधळी या काळात रजा काढून आपल्या गावात येतात. त्यामुळे त्यांना डबल उत्पन्न मिळते. बदलत्या चंगळवादाचा फायदा आता याही व्यवसायाला मिळू लागला आहे. खेळीमेळीच्या वातावरणात रात्री कथेचा कार्यक्रम होतो आणि हास्याचे फवारे उडतात.
एखादी पौराणिक किंवा काल्पनिक कथा रात्रभर नागरिकांना खिळवून ठेवते. हा कार्यक्रम पहाटे ४ पर्यंत चालतो. अखंड रात्र यासाठी जागवली जाते. गोंधळाची ही अनोखी ही प्रथा आणि परंपरा आजही जुन्या परंपरेनुसार टिकून राहिली आहे. गोंधळासाठी खास करुन बोकडाचा बळी दिला जातो आणि हे मांसाहारी जेवण संपूर्ण गावाला देण्याची प्रथा आहे. त्यामुळे गोंधळ म्हटले की, एक अनोखी पर्वणीच असते. याहीवर्षी हा उत्सव उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)


अंबाबाईचा गोंधळ घालण्याची प्रथा ही कित्येक वर्षांपूर्वीची जुनी आहे. ऐतिहासिक काळापासून सुरू असलेली ही प्रथा आजही गावागावांमध्ये जपली जात आहे. गोंधळाच्या कार्यक्रमाला गावाबाहेर असलेले ग्रामस्थही आवर्जून उपस्थित राहतात आणि देवीचा गोंधळ मांडतात.

Web Title: Thousands of 'Ambush'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.