‘जेलभरो’साठी हजारो मच्छिमार रस्त्यावर

By admin | Published: December 4, 2014 12:56 AM2014-12-04T00:56:45+5:302014-12-04T00:56:45+5:30

कलम ३०७ अंतर्गत गुन्हे दाखल

Thousands of fishermen are on the road for 'Jail Bharo' | ‘जेलभरो’साठी हजारो मच्छिमार रस्त्यावर

‘जेलभरो’साठी हजारो मच्छिमार रस्त्यावर

Next

मालवण : निवती समुद्रातील संघर्षानंतर पारंपरिक मच्छिमारांवर कलम ३०७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज, बुधवारी ‘जेलभरो’ आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात हजारो पारंपरिक मच्छिमार सहभागी झाले. तत्पूर्वी दांडी ते पोलीस ठाणे अशा काढलेल्या महामोर्चात ‘मच्छिमार एकजुटीचा विजय असो’, पर्ससीन रोखा - मच्छिमार जगवा’ अशा घोषणा देण्यात आल्या.
पारंपरिक मच्छिमारांनी केवळ १३ जणांना नको, आम्हा सर्वांनाच अटक करा, असा पवित्रा घेतला. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात, तहसीलदार वनिता पाटील यांनी मच्छिमारांना सामोरे जात त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा
केली.
जिल्ह्यातील विनापरवाना मासेमारी करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मोहीम हाती घेऊ, कलम ३०७ संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर पारंपरिक मच्छिमारांनी आंदोलन स्थगित केले. दरम्यान, आश्वासने न पाळल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या पायरीवर पारंपरिक मच्छिमार बेमुदत उपोषणाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी मच्छिमार नेत्यांनी दिला.
...तर विधानसभेसमोर उपोषण
प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून अनधिकृत मासेमारीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच खोटे गुन्हे दाखल झाल्याबाबतही तोडगा काढण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले, तरीही शासनाने आपला शब्द न पाळल्यास आगामी नागपूर अधिवेशनात विधानसभेच्या पायऱ्यांवर पारंपरिक मच्छिमार उपोषणाला बसतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. आज, बुधवारी पारंपरिक मच्छिमारांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सकाळच्या सत्रात मासळी मार्केट, बाजारपेठ, स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग बंद ठेवण्यात आले होते.
मच्छिमार प्रतिनिधींशी बैठक
तहसीलदार वनिता पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांनी पोलीस ठाण्यात सहायक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण, परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर, आमदार वैभव नाईक यांच्यासह मच्छिमार प्रतिनिधींशी तातडीची बैठक घेतली. खरात यांनी अनधिकृत मिनी पर्ससीननेटमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. मत्स्य विभागाने परवाने नसलेल्या व अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर कारवाईसाठी पुढाकार घ्यावा. त्यांच्या बोटी जप्त कराव्यात, अशा सूचना केल्या. यासाठी लागणारा पोलीस फाटा पुरविण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. अनधिकृत मासेमारीवर कारवाईसाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात यावा, असे तहसीलदार वनिता पाटील यांनी सांगितले.
 

Web Title: Thousands of fishermen are on the road for 'Jail Bharo'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.