हजारो आंबा-काजू कलमे भस्मसात
By admin | Published: January 1, 2016 10:11 PM2016-01-01T22:11:49+5:302016-01-02T08:28:53+5:30
लाखोंची हानी : नडगिवे, खारेपाटण परिसरात आगीचे तांडव
खारेपाटण : नडगिवे परिसरात शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे पाच किलोमीटर परिसरातील हजारो काजू, आंबा कलमे जळून खाक झाली. मोहोर येण्याच्या ऐन हंगामात लागलेल्या या आगीमुळे बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग लागलेला परिसर मनुष्यवस्तीपासून लांब असल्याने आग लागल्याचे सुरुवातीला लक्षातच आले नाही. सायंकाळपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. खारेपाटण ते नडगिवे या परिसरात सुमारे पाच किलोमीटर अंतरात सुकलेल्या गवताने पेट घेतला. धुराचे लोट दिसल्यानंतर ग्रामस्थांची धावपळ उडाली. काजू, आंबा कलमे आगीच्या विळख्यात सापडल्याने बागायतदारांची गाळण उडाली. सर्वांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु आग मोठ्या परिसरात पसरल्याने ग्रामस्थांना आंबा-काजू कलमे बेचिराख होताना पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आगीने अंबीचा माळ, आशियेचा टोना, वडाचा टोना, उंबरसखल, कोंडाचे सखल, डगरीचा आंबा, भिवारी सखल, कुंबीयाचा माळ या परिसरात सर्व भस्मसात केले. परिसरातील सुमारे १५ बागायतदारांच्या कलम बागा बेचिराख केल्या.
दीपक भिकाजी चव्हाण यांची २०० काजू, १०० सागवान कलमे, दीपक जनार्दन मांजरेकर यांची १०० काजू, १०० सागवान व १० आंबा कलमे, सुदर्शन मांजरेकर यांची काजू आणि सागाची प्रत्येकी १०० कलमे, शशिकांत मांजरेकर यांची काजू, सागवान प्रत्येकी १०० कलमे, गणपत करंगुटकर यांची २०० काजू, १०० सागाची कलमे आणि पक्के बांधकाम केलेली खोपी, अहिल्या मांजरेकर यांची २०० काजू कलमे, सूर्यकांत मांजरेकर यांची १०० काजू कलमे, एकनाथ करंगुटकर यांची २०० काजू कलमे, प्रकाश शिर्सेकर यांची २०० काजू कलमे, मारुती शिर्सेकर यांची ५० काजू कलमे, हेमंत शिर्सेकर यांची काजू, सागाची प्रत्येकी १०० कलमे, चंद्रकांत मांजरेकर यांची १०० काजू कलमे, श्रीधर सावंत यांची ५०० काजू कलमे, सूर्यकांत मांजरेकर यांची साग, काजूची प्रत्येकी १०० कलमे जळून खाक झाली. या आगीमुळे आंबा-काजू उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले आहे. (वार्ताहर)
हातातोंडाशी आलेला घास हिरावला
आता काजू, आंब्याचा हंगाम काही दिवसांत सुरू होईल. सध्या काजू व आंब्याची कलमे मोहोरली आहेत. मात्र, अचानक लागलेल्या या आगीमुळे खारेपाटण, नडगिवे परिसरातील बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेले पीक बहरायच्या आधीच नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
हुर्से-बाकाळेतही हजारो कलमे खाक
राजापूर : राजापूर तालुक्यातील हुर्से-बाकाळे परिसरात शुक्रवारी सकाळपासून लागलेल्या आगीत हजारो कलमे बेचिराख झाली आहेत. सकाळी आग लागूनही कोणतीही शासकीय यंत्रणा सायंकाळपर्यंत न पोहोचल्याने या आगीचा भडका देवगडच्या दिश्ोने (सिंधुदुर्ग) सरकत आहे. रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती. या आगीचा सर्वाधिक फटका पाच मोठ्या बागायतदारांसह अनेक छोट्या बागायतदारांनाही बसला आहे.
शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हुर्से-बाकाळे येथे असलेल्या एका बागेला आग लागली. या आगीचे कारण समजू शकले नाही. सोसाट्याचा वारा असल्यामुळे ही आग भडकली व शेजारीच असलेल्या बागेपर्यंत पोहोचली. हळूहळू आगीचा भडका वाढला. ग्रामस्थांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत राजापूर तहसील कार्यालयालाही कळविण्यात आले .
आपत्कालीन कक्षाकडून याबाबतची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते; मात्र ती पोहोचली नाहीच उलट ज्यांना याबाबतची माहिती कळविण्यात आली होती ती यंत्रणाही रात्रीपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे भडकलेली आग आटोक्यात आणण्याचे काम माती टाकून तसेच फांद्यांच्या साहाय्याने सुरू होते. मात्र, त्याला मर्यादा पडत होत्या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शाखाप्रमुख राजेश कोंडेकर, मंगेश मांजरेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील मोहन गावकर, एकनाथ गावकर, हरिश्चंद्र वाडेकर, शैलेश गावकर, रामचंद्र राऊत या बागायतदारांची शेकडो कलमे आगीत भस्मसात झाली आहेत. छोट्या बागायतदारांनाही या आगीचा फटका बसला आहे. रात्री उशिरापर्यंत ही आग पूर्णत: आटोक्यात आली नव्हती.(प्रतिनिधी)