‘धागा’ बनला त्यांच्या संघटनेचे बळ
By admin | Published: November 12, 2016 11:16 PM2016-11-12T23:16:27+5:302016-11-13T01:14:40+5:30
तुळजाभवनी गटाची किमया : मायक्रॉन धाग्यापासून सुसज्ज वस्तूनिर्मिती
सावंतवाडी : सावंतवाडीतील परंपरागत व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा लाकूड हा शहराचा मुख्य व्यवसाय आहे. तरीही अशा पारंपरिक व्यवसायाला बगल देऊन मायक्रॉनसारख्या धाग्यापासून वस्तूंची निर्मिती करून महिलांनी आपली प्रगती केलीच, पण त्याचबरोबर या माध्यमातून शहराची जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तंतूंनी जशी धाग्याची निर्मिती होते आणि अनेक धाग्यांनी कठीण दोरखंड बनून तो संघटनेला बांधून ठेवतो, त्यापद्धतीनेच शिरोडानाका-सालईवाडा येथील महिलांनी एकमेकांत गुंतून बचतगटाची स्थापना केली. त्यातून मोठा व्यवसाय उभारला आणि तो व्यवसायच आता या सर्व महिलांच्या उदरनिर्वाहाचा, प्रगतीचा मुख्य दोर बनला आहे. ही यशोगाथा आहे सावंतवाडी येथील तुळजाभवानी स्वयंसहाय्यता महिला बचतगटाची.
शिरोडानाका-सालईवाडा येथील श्री तुळजाभवानी स्वयंसहाय्यता महिला बचतगटाची स्थापना ९ नोव्हेंबर २००९ साली झाली. या गटाच्या सदस्या भारती मोरे यांच्या संकल्पनेतून या बचतगटाची स्थापना केली. गट स्थापन करताना कै. मंगल शृंगारे यांनी मोलाचे सहकार्य केले होते. त्यांच्या मदतीनेच बचतगटाची स्थापना झाली. सालईवाडा, शिरोडानाका, गरड, सर्वोदयनगर येथील महिलांना एकत्रित करून बचतगटाला सुरुवात केली. त्यावेळी प्रतिमहा १०० रुपये वर्गणी गोळा करून केली. त्यानंतर सहा महिन्यांतच सिंधुदुर्ग बँकेकडून कर्ज घेऊन मायक्रॉन धाग्यापासून वस्तू बनविणे, कॅटरिंग असे विविध व्यवसाय सुरू केले. त्यानंतर सिंधुदुर्ग बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली. यशस्वी वाटचाल ठेवल्याने बँकेतही त्यांनी विश्वासार्हता जपली. नियमित कर्जफेड केल्याने त्यांना पुन्हा कर्ज घेता आले. गटाच्या खात्यामधून व्यक्तींना कर्ज देऊन त्यातून मिळणारा नफा दर दोन वर्षांनी समान वाटण्यात येतो.
याशिवाय या महिलांनी सुंदरवाडी महोत्सवामध्ये झुणका भाकरचा स्टॉल लावत जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. यावेळी स्वादिष्ट झुणका भाकर करून त्यांनी येणाऱ्या पर्यटकांसमोर मालवणी डिशची मेजवानी सादर केली होती. त्यातूनही त्यांना मोठा नफा मिळाला. या बचतगटाच्या यशस्वी प्रयत्नामुळे महिला बचतगटातील सर्वच सदस्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. बचतगटाचा आधारस्तंभ भारती मोरे, अध्यक्षा सुनीता तोगरे व इतर सदस्यांच्या सहकायार्मुळे हा महिला बचतगट प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याकामी गटातील महिलांनी दाखविलेली एकजूट फार महत्त्वाची आहे. महिलांनी एकजूट केली तर त्या काय करू शकतात, ते या बचतगटाने दाखवून दिले आहे. या बचतगटाची प्रगती समाधानकारक आहे.
या गटामध्ये अध्यक्षा सुनीता सुनीता तोगरे, उपाध्यक्षा स्मिता रेडकर, सचिव उल्का पालव, सदस्या भारती मोरे, नलिनी मुळीक, स्मिता पडते, शीला पडते, दिव्या मोरजकर, स्वामिनी सावंत, सुलभा टोपले, अर्चना बिर्जे, स्वाती गमरे, अपर्णा नाडकर्णी यांचा समावेश आहे.
बचतगटाच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास होत आहे, पण महिला बचतगटांच्या माध्यमातून निर्मित वस्तूंना अजूनही सक्षम बाजारपेठेची उणीव आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा बाजारपेठेची निर्मिती केली तर शहरातील महिलांना आणखी रोजगार मिळू शकतो.
- सुनीता तोगरे, बचतगट अध्यक्षा