नीलिमा वालावलकर यांना धमकी, पोलिसांत तक्रार : भाजपाच्या चार कार्यकर्त्यांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 04:10 PM2020-11-03T16:10:53+5:302020-11-03T16:13:13+5:30
Bjp, Shiv Sena, Election, sindhudurg, Police भाजपातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या कुडाळ पंचायत समितीच्या सदस्या नीलिमा वालावलकर यांनी भाजप कार्यकर्त्यांकडून धमकी आल्याची लेखी तक्रार कुडाळ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
कुडाळ : भाजपातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या कुडाळ पंचायत समितीच्या सदस्या नीलिमा वालावलकर यांनी भाजप कार्यकर्त्यांकडून धमकी आल्याची लेखी तक्रार कुडाळ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची याबाबत वालावलकर यांनी भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, युवा सेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर उपस्थित होते. या लेखी तक्रारीत वालावलकर यांनी नमूद केले की, त्या पिंगुळी काळेपाणी येथे पती व दोन मुलांसहीत राहतात. पिंगुळी पंचायत समिती सदस्यपदी त्या स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्या. ३१ ऑक्टोबरला कुडाळमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
त्याच रात्री १० वाजता कुटुंबासह घरी असताना भाजपाचे रणजित देसाई, विनायक राणे, अजय आकेरकर, सतीश माड्ये हे चार कार्यकर्ते गाडी घेऊन घरी आले. त्यांनी धमकावले की, तुम्ही शिवसेनेत प्रवेश का केला? आम्ही तुमच्या निवडणुकीत जो खर्च केला तो आम्हांला परत करा. तुम्हांला आमदार नीतेश राणे काय आहेत हे माहीत आहे ना? ते काय करू शकतात? तुमच्या पतीला व मुलांना मारहाण करू शकतात. तुम्हाला समजणारही नाही असे सांगितले अशा धमक्या दिल्याचे नमूद केले.
मी शिवसेनेत कोणाच्याही दबावाखाली प्रवेश केला नाही. केवळ पिंगुळीवासीयांच्या विकासासाठी केला. निवडणूक स्वतःच्या खर्चाने लढवली. मी कुणाकडून व पक्षाकडून पैसे घेतले नाही. माझी व्हॉट्सॲपद्वारे नाहक बदनामी करण्यात येत आहे. माझे कुटुंब व मी गेले दोन दिवस दडपणाखाली असून आमच्या कुटुंबाला मारहाण झाली तर याला हे चार जण जबाबदार राहतील असे अर्जात नमूद करण्यात आले. भविष्यात मला व कुटुंबाला कुठलाही धोका होणार नाही. अनुचित प्रकार घडणार नाही अशा प्रकारचा जबाब त्यांच्याकडून घ्यावा. मला व कुटुंबाला न्याय मिळावा. महिला म्हणून सहानुभूती मिळावी, अशी मागणी त्यांनी लेखी तक्रार अर्जातून केली आहे.