अश्लील चित्रफीत पसरवण्याची धमकी
By admin | Published: June 9, 2015 12:56 AM2015-06-09T00:56:44+5:302015-06-09T00:59:00+5:30
सकाळी तक्रार, सायंकाळी माघार : दोडामार्ग तालुक्यातील प्रकार; युवतीने लग्नास नकार दिल्याने प्रेमवीराचे कृत्य
सावंतवाडी : फेसबुकवरून झालेली मैत्री, प्रेम व नंतर धोका अशा त्रिकोणात सापडलेल्या एका युवतीला जेव्हा दोन्ही प्रेमवीरांकडून अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी मिळते, तेव्हा मात्र ती युवती पोलिसांचे दार ठोठावते. मात्र, सकाळी केलेली तक्रार तिने सायंकाळी माघार घेतल्यानंतर या गौडबंगालची चर्चा तालुक्यात आजचा विषय बनून राहिली.
दोडामार्ग तालुक्यातील युवती मुंबई येथे आपल्या नातेवाइकांकडे राहत होती. यावेळी तिची फेसबुकवरून तालुक्यातील एका गावातील युवकाशी ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यावेळी ते दोघेही मुंबईतील अनेक ठिकाणी फिरायलाही गेले होते; पण नंतर या युवकाला त्या युवतीने टाळण्याचा प्रयत्न केला. याचा राग मनात धरून तो युवक तिला सतत धमकावत होता.
याच काळात त्या युवतीची ओळख सावंतवाडी तालुक्यातील एका गावातील युवकाशी झाली. ही ओळख फेसबुकवरूनच झाली होती. दोघेही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार होते. मात्र, याची माहिती पहिल्या युवकाला समजली. त्याने दुसऱ्या युवकाची भेट घेत ‘तू तिच्याशी लग्न करू नकोस, माझे व तिचे पहिले प्रेम आहे’, असे सांगितले. तसेच तू लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर मी तिची अश्लील चित्रफीत प्रसारित करेन, अशी धमकीही त्याने दिली होती. यानंतर मात्र दुसऱ्या युवकाने त्या युवतीसोबत लग्न करण्यास टाळाटाळ केली. आपले लग्न मोडले. त्याशिवाय बदनामीही झाली, यामुळे त्या युवतीने थेट सावंतवाडी पोलीस ठाणे गाठत झालेला प्रकार पोलिसांजवळ कथन केला. तसेच पोलिसांनी याबाबत तक्रारही नोंदविली. आपली तसेच गावाची बदनामी होईल या भीतीने संबंधित युवतीच्या आई व वडिलांनी ही तक्रार मागे घेतली. सकाळी तक्रार दिली, तर सायंकाळी तक्रार मागे घेतल्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले. (प्रतिनिधी)
युवतीवर दबाव की पोलिसांवर?
घटनेची कुणकुण लागताच कोलगाव येथील राजकीय पदाधिकारी पोलीस ठाण्यात गोळा झाले होते. त्यामुळे हे राजकीय पदाधिकारी युवतीवर दबाव आणण्यासाठी गोळा झाले होते की पोलिसांवर, याची चर्चा उशिरापर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू होती.
तक्रार असती तर कारवाई नक्कीच केली असती : वेडे
आमच्याकडे प्रथम युवतीने तक्रार दिली होती. मात्र, तिने ती तक्रार नंतर मागे घेतली. याचे नेमके कारण आम्हाला कळले नाही. तिने तक्रार दिली असती, तर नक्की कारवाई केली असती, असे पोलीस उपनिरीक्षक दिलीप वेडे यांनी सांगितले.