सज्जनराव रावराणे यांना धमकी

By Admin | Published: October 18, 2015 12:19 AM2015-10-18T00:19:06+5:302015-10-18T00:20:55+5:30

वैभववाडीची घटना : अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार, बाजारपेठ बंद

Threatens to Sajjanrao Ravnane | सज्जनराव रावराणे यांना धमकी

सज्जनराव रावराणे यांना धमकी

googlenewsNext

वैभववाडी : येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सज्जनराव रावराणे यांना अनोळखी व्यक्तींनी शुक्रवारी धमकी दिली. त्यामुळे काँग्रेसेतर सर्वपक्षीय शनिवारी सकाळी एकवटले. सर्वपक्षीयांनी व्यापाऱ्यांना आवाहन करीत काहीकाळ बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविला.
काँग्रेसेतर सर्वपक्षीयांसह व्यापाऱ्यांनीही सज्जनरावांना पाठिंबा म्हणून पोलीस ठाणे गाठले. या सर्वांनी प्रचारासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तींना शहराबाहेर काढण्याची मागणी केली. मतदार यादीत नाव नसलेली व्यक्ती शहरात ठेवणार नाही, असे आश्वासन पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिले. दरम्यान, सज्जनराव यांनी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली.
४५ वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले सज्जनराव यांच्या पत्नीला प्रभाग क्र. १२ मधून काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यामुळे सज्जनरावांची पत्नी सरिता भाजपकडून निवडणूक लढवित आहेत. यामुळे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी रावराणे यांना धमकावले. याबाबत त्यांनी काँग्रेसेतर सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे काँग्रेसेतर सर्वपक्षीय कार्यकर्ते देवीच्या मंडपात जमले. त्यांनी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सज्जनरावांना धमकावल्याचे सांगून निषेध म्हणून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले. ते व्यापारी, पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यानंतर बाजारपेठत फिरून व्यापाऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बाजारपेठ बंद केली. सर्वजण पोलीस ठाण्याकडे गेले. पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, उपनिरीक्षक राजेंद्र्र गुरव यांनी या जमावाशी चर्चा केली. त्यावेळी अनोळखी वाहने घेऊन आलेले लोक शहरात राहत असून, शहरातील लोकांना धमकावून दहशत निर्माण करीत आहेत. त्यांना शहराच्या बाहेर काढा, अशी मागणी सर्वपक्षीय आणि व्यापारी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली. या काळात शहरात तणाव सदृश वातावरण होते.
पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी मतदार यादीत नाव नसलेल्या अनोळखी व्यक्तींना शहरात ठेवणार नाही, असे स्पष्ट केले. आणि जर कोणी तसे आढळले, तर तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन बर्वे यांनी केले. तसेच अनोळखी व्यक्तींचा मुक्काम असलेली ठिकाणे आणि त्यांच्याकडील वाहनांची माहिती पोलिसांनी घेतली.
यावेळी सज्जनराव रावराणे, दिगंबर सावंत, मनोज सावंत, जयेंद्र्र रावराणे, प्रमोद रावराणे, अशोक रावराणे, गुलाबराव चव्हाण, विजय रावराणे, मंगेश लोके, टी. एस. घोणे, रत्नाकर कदम, भानुदास तावडे, रणजित तावडे, दिलीप रावराणे, मारुती मोहिते, गणेश मसूरकर, शंकर स्वामी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सज्जनरावांची तक्रार
शुक्रवारी सकाळी १0.३0 च्या सुमारास घराजवळ असताना आमदार नीतेश राणे सांगुळवाडीकडून वैभववाडी बाजारपेठत येताना दिसले. तेव्हा आपण त्यांना हात दाखविला. आमदार राणे थांबले. त्यांच्याशी चर्चाही झाली. ते निघून गेले. मात्र, त्यांच्या पाठोपाठ असणाऱ्या वाहनात तीन अनोळखी लोक होते. माझ्याकडे पाहून त्यांनी याला बघून घ्या रे, असे धमकावले आणि निघून गेले. त्यामुळे त्यांच्यापासून धोका असल्याची तक्रार सज्जनराव यांनी पोलिसांत दिली आहे.
 

Web Title: Threatens to Sajjanrao Ravnane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.