मालवणात तीन अर्ज अवैध
By admin | Published: November 2, 2016 11:28 PM2016-11-02T23:28:21+5:302016-11-02T23:28:21+5:30
नगरपालिकेची निवडणूक : छाननी प्रक्रियेत ‘आक्षेपा’चे राजकारण
मालवण : मालवण पालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडे दाखल केलेल्या उमेदवारांच्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नगराध्यक्षपदाच्या दहाही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर नगरसेवक पदासाठी दाखल केलेल्या ६१ अर्जांपैकी तीन अर्ज अधिकाऱ्यांनी अवैध ठरविले आहेत. त्यामुळे आता नगराध्यक्षांसह नगरसेवक उमेदवारांची संख्या ६८ इतकी झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ११ नोव्हेंबर अंतिम तारीख असल्याने कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, तहसील कार्यालयात उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या वेळी वैध-अवैधतेबरोबर आक्षेपांचे राजकारण रंगले होते. सुरुवातीला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरु असताना अपक्ष उमेदवार सुदेश आचरेकर यांनी युतीचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर प्रशसकीय आक्षेप घेत कांदळगावकर यांचे सेवानिवृत्तीपूर्वीचे पालिकेत आर्थिक व्यवहार पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे पालिकेत हितसंबंध आहेत, असा आरोप करत लेखी हरकत सादर केली. यावर पीठासीन अधिकारी यांनी लेखी पुरावे सादर करण्यास सांगितले. मात्र पुरावे सादर न करण्यात आल्याने आक्षेप फेटाळून लावण्यात आला.
मालवण तहसील कार्यालय येथे बुधवारी डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी पालिका मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रंजगा गगे, तहसीलदार वीरधवल खाडे, पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नगराध्यक्ष पदाचे अर्ज वैध
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची छाननी प्रक्रियेत आठ उमेदवारांचे दहा अर्ज वैध ठरविण्यात आले. युतीचे उमेदवार महेश कांदळगावकर यांनी शिवसेनेकडून १ व अपक्ष म्हणून २ असे सादर केलेले तीनही अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यांच्यासह सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी महेंद्र पराडकर, गोविंद चव्हाण, रुपेश प्रभू, महेश जावकर, सुधाकर पंतवालावलकर यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.
काँग्रेस उमेदवारांचा आक्षेप
छाननी प्रक्रियेच्या सुरुवातीलाच सुदेश आचरेकर यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर नगरसेवक उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया सुरु असताना प्रभाग तीनमधील शिवसेना उमेदवार महेंद्र म्हाडगुत यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार यतीन खोत यांनी आक्षेप घेतला. तर प्रभाग सातमधील काँग्रेस उमेदवार संतोष कांदळकर यांनी भाजपचे उमेदवार आप्पा लुडबे यांच्या विरोधात आक्षेप घेतला. खोत यांनी म्हाडगुत यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी यतीन खोत यांनी वाळू आंदोलनातील दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती अर्जात दिली आहे का? अशी विचारणा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. त्यावर उमेदवारी अर्जात सर्व माहिती नोंद असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अर्ज बाद
नगरसेवक पदासाठी प्रभाग ४ आणि ५ या दोन जागांसाठी उमेदवारी दाखल केलेल्या भाजपचे संदीप शिरोडकर यांचे दोन्हीही अपक्ष अर्ज एबी फॉर्म व पाच सूचक नसल्याने अवैध ठरविण्यात आले.
प्रभाग सातमध्ये भाजपचे उपशहर अध्यक्ष सुनील (मनोज) मोंडकर यांनी बंडखोरी करत पक्षाचा व अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले होते. त्यातील एका अर्जात एबी फॉर्म व पाच सूचक नसल्याने तो अर्ज अवैध ठरविला.