ओसरगाव येथे अवैध दारू वाहतूक प्रकरणी तिघांना अटक, ४८ लाखाची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 04:55 PM2021-11-21T16:55:38+5:302021-11-21T16:56:29+5:30
कणकवली: कणकवली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ओसरगाव येथे अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली. यात ४८ लाख ...
कणकवली: कणकवली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ओसरगाव येथे अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली. यात ४८ लाख २३ हजार ८९४ रूपये किंमतीची दारू तर १६ लाखाच्या टेंपोंसह एकूण ६४ लाख २३ हजार ८९४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर, तिघांना ताब्यात घेण्यात आले. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी संशयित रवी चंद्रकांत जाधव (२८), नरेंद्र रामसेवक गुप्ता (३२, दोन्ही रा. ठाणे) आणि सिध्दार्थ मधुकर घोडगे (३५, रा.दहिसर मुंबई) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांना कणकवली न्यायालयात हजर केले असता २३ नोव्हेंबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
दोन टेंपो गोवा ते मुंबईच्या दिशेने अवैध गोवा बनावट दारूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई - गोवा महामार्गावर ओसरगाव विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला. दोन संशयास्पद टेंपो थांबवून तपासणी केली असता दिशाभूल करण्यासाठी मैद्याची पोती लावून आतमध्ये गोवा बनावट दारू आढळून आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सिंधुदुर्गचे अधीक्षक डॉ. बी.एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी कणकवलीचे निरीक्षक पी.जी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक दळवी, पुजारी, दुय्यम निरीक्षक जी. सी. जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान सुरज चौधरी, महिला जवान स्नेहल कुवसेकर, जवान आणि वाहनचालक रणजित शिंदे, शिवशंकर मुपडे, जंगम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अटक केलेल्या संशयित तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांना कणकवली न्यायालयात हजर केले असता २३ नोव्हेंबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. याकामी मदतनीस म्हणून शहा व खान यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास कणकवलीचे निरीक्षक पी.जी. सावंत करत आहेत.