दरोड्याप्रकरणी तिघांना सक्तमजुरी
By admin | Published: September 16, 2015 12:45 AM2015-09-16T00:45:39+5:302015-09-16T00:49:42+5:30
तिघेही निर्दोष : दापोली तालुक्यातील पिसई येथील घटना
खेड : घरात घुसून दरोडा घालणाऱ्या सहा आरोपींपैकी तिघांना सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. उर्वरित तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खेडचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. जोशी यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
दापोली तालुक्यातील पिसई गावातील लक्ष्मी सुधीर खताते यांच्या घरात पाणी पिण्याचा बहाणा करून इमरान शेख अब्दुल सत्तार शेख, संतोष प्रकाश गुरव आणि किरण कृष्णा मोरे यांच्यासह अन्य तिघेजण घुसले. त्यांनी लक्ष्मी यांचे तोंड व हातपाय बांधून ठेवले आणि घरातील कपाटातील दागिने व रोख रक्कम असा ५७ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. २५ डिसेंबर २०१३ रोजी हा दरोडा टाकण्यात आला होता. या तिघांना ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ३ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी खेड येथील या न्यायालयात झाली. याचवेळी न्यायाधीशांनी उर्वरित आरोपी महेश राजकुमार यादव, महादेव ऊर्फ गोट्या सहदेव मगर आणि रोहित ऊर्फ प्यारो भीमराव जाधव या तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले.