Sindhudurg: आचरा समुद्रात होडी खडकावर आदळली, तिघांचा मृत्यू, नारळी पौर्णिमा दिवशीच घडली दुर्दैवी घटना
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 19, 2024 12:40 PM2024-08-19T12:40:15+5:302024-08-19T12:40:44+5:30
धुक्यामुळे अंदाज न आल्याने दुर्घटना
आचरा (सिंधुदुर्ग) : मालवण तालुक्यातील आचरा येथील समुद्रात नारळी पौर्णिमा उत्सवाच्या दिवशी मध्यरात्री सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली पात (छोटी होडी) नौका खडकावर आदळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला तर एकाने पोहत येऊन किनारा गाठल्याने त्याचे प्राण वाचले.
मृतांमध्ये नौकामालक व सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन, सेवानिवृत्त शिक्षक गंगाराम ऊर्फ जीजी आडकर (वय ६७), खलाशी प्रसाद भरत सुर्वे (३२), लक्ष्मण शिवाजी सुर्वे (६५) यांचा समावेश आहे. तर विजय अनंत धुरत (५३, रा. मोर्वे देवगड), असे बचावलेल्याचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे सर्जेकोट गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, दुर्घटनेचे वृत्त समजताच पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम पडवळ, हवालदार सुदेश तांबे, मिलिंद परब, मनोज पुजारे, विशाल वैजल आदींनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी पाहणी केली.
चौघांनीही टाकल्या समुद्रात उड्या
सर्जेकोट येथील गंगाराम ऊर्फ जीजी आडकर हे रविवारी रात्री आपली जनता जनार्दन या नावाची मच्छीमारी पात नौका घेऊन तीन खलाशांना घेऊन समुद्रात मासेमारीला गेले होते. कुणकेश्वर येथील समुद्रात मासेमारी करून जाळी ओढल्यावर ते माघारी परतत असताना मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास धुक्यामुळे नौका हेलकावे घेऊन पाणी भरू लागल्याने जीव वाचविण्यासाठी चौघांनीही समुद्रात उड्या घेतल्या. सोमवारी पहाटे यातील विजय धुरत हे आचरा बंदर नजीकच्या समुद्रातून पोहत येताना दिसून आले. तर अन्य तिघे मच्छीमार बेपत्ता होते.
विजय धुरतवर उपचार सुरू
सोमवारी सकाळी हिर्लेवाडी व वायंगणी किनाऱ्यावर तिन्ही बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह आढळले. हे मृतदेह आचरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर पोहत आलेल्या विजय धुरत यांच्यावर आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.