उर्दूची प्रश्नपत्रिका तीन हस्ताक्षरात
By Admin | Published: December 14, 2014 10:17 PM2014-12-14T22:17:09+5:302014-12-14T23:48:28+5:30
टीईटी परीक्षा : वेगवेगळ्या अक्षरांमुळे परीक्षार्थीही गोंधळले...
रत्नागिरी : शासनाकडून आज रविवारी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता फेरीच्या मराठी व इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका प्रिंटिंग केलेल्या, तर उर्दू शिक्षकांसाठीच्या प्रश्नपत्रिका हस्ताक्षरात लिहिलेल्या असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हे हस्ताक्षरही एका व्यक्तीचे नसून तीन वेगवेगळ्या व्यक्तींचे
होते.
टीईटी परीक्षा नको, असा सूर भविष्यात शिक्षक म्हणून कार्यरत होणाऱ्या डी. एड.धारकांकडून फार पूर्वीपासून उमटत आहे. हजारो रुपये खर्च करुन दोन वर्षे मेहनत करुन डी. एड. पदवी मिळवण्यात येते. मात्र, त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येत असल्याने डी. एड.धारकांमधून नाराजी पसरलेली आहे. गतवर्षी शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल अगदी कमी लागल्यामुळे शिक्षण क्षेत्रात चलबिचल निर्माण झाली होती.
आज रत्नागिरीसह इतर जिल्ह्यातही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी जिल्हाभरातून हजारो विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यासाठी मराठी, इंग्रजी आणि उर्दू अशी तीन प्रकारच्या प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या होत्या.
मराठी व इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका छपाई करण्यात आल्या होत्या. मात्र, उर्दूची प्रश्नपत्रिका छपाई न करता ती हस्ताक्षरात लिहून त्याच्या प्रती परीक्षार्थींना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अगोदरच या परीक्षेपासून नाराज असलेल्या डी. एड.धारकांच्या नाराजीमध्ये आणखीच सूर मिसळला.
या परीक्षेसाठी काढण्यात आलेली उर्दूची प्रश्नपत्रिका हस्ताक्षरात लिहिलेली असली तरी ती एकाच व्यक्तीच्या हस्ताक्षरात असणे आवश्यक होते. मात्र, त्या प्रश्नपत्रिकेतील हस्ताक्षर एका व्यक्तीचे नसून वेगवेगळ्याा तीन व्यक्तींचे असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.
अशा प्रकारची वेगवेगळ्या हस्ताक्षरातील प्रश्नपत्रिका काढण्यात आल्याने परीक्षार्थींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. इतर माध्यमाच्या प्रश्नपत्रिका छपाई केलेल्या, तर उर्दू माध्यमाची प्रश्नपत्रिका हस्ताक्षरात का, असा प्रश्न उर्दूच्या परीक्षार्थींकडून व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)