आंबोली घाटात सुमो उलटून तीनजण जखमी
By admin | Published: May 31, 2014 12:55 AM2014-05-31T00:55:28+5:302014-05-31T01:12:14+5:30
सुमो सांगलीची : साखरपुड्यासाठी चालले होते गोव्याला
सावंतवाडी : सांगलीहून गोवा-मडगाव येथे साखरपुड्यासाठी जाणार्या सुमोला आंबोली-कुंभेश्वरनजीक अपघात झाला. या अपघातात नियोजित वरासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात चार वर्षांचा मुलगा आश्चर्यकारकरीत्या बचावला. अपघातानंतर जखमींना तत्काळ एस.टी. बसने सावंतवाडीत आणण्यात आले. याबाबत माहिती अशी की, सांगली येथील वाकोडे कुटुंबीय आज, शुक्रवारी गोवा-मडगावकडे चार वाहनांतून साखरपुड्यासाठी चालले होते. दुपारी ही सर्व वाहने भरधाव वेगाने जात होती. त्यातीलच सुमोमध्ये नियोजित वरासह अन्य सात ते आठजण होते. भरधाव वेगाने चाललेली सुमो आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कुंभेश्वर येथील एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाडावर आदळून उलटली. अचानक घडलेल्या या अपघातात नियोजित वरासह सर्व प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने एस.टी. बसने सावंतवाडी कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. यातील तिघांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात नियोजित वर प्रसाद वाकोडे (वय २२), चालक महेश बाळासाहेब कोळी (२२), किरण लक्ष्मण भिसे (२४) या तिघांना गंभीर दुखापत झाली असून, अश्विनी वाकोडे (१९) हिला किरकोळ दुखापत झाली. प्रसादचे वृद्ध आई-वडीलही या अपघातातून बचावले आहेत. (प्रतिनिधी)