चोरीप्रकरणातील तिघे संशयित ताब्यात
By admin | Published: April 20, 2016 10:45 PM2016-04-20T22:45:24+5:302016-04-20T22:45:24+5:30
मुख्य आरोपी पसार : कणकवली पोलिसांची कारवाई
कणकवली : महिलेच्या डोळ्यात मसाला फेकून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास करण्याची घटना ३ एप्रिल रोजी कणकवली शहरात घडली होती. या चोरीप्रकरणी पोलिसांनी ३ संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर या चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी पसार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
३ एप्रिल रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास भालचंद्र महाराजांच्या आश्रमातील आरती झाल्यानंतर शहरातील विद्यामंदिर हायस्कूल जवळील गुरूकृपा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुहासीनी माणगांवकर आपल्या घरी परतत होत्या. त्यांच्यासोबत त्यांची नात होती. गुरूकृपा अपार्टमेंटमध्ये जात असताना एका अज्ञात तरूणाने त्यांच्या डोळ्यात मसाला फेकला. तसेच त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे व एक तोळ्याचे असे ९७ हजार ५०० रूपये किंमतीची दोन मंगळसूत्रे लंपास करून मोटरसायकलवरून पोबारा केला होता.
या प्रकरणाचा तपास पोलिस करत होते. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक गीताराम शेवाळे पथकासह गस्त घालीत होते. यावेळी बसस्थानकाच्या परिसरात त्यांना प्रफुल्ल प्रकाश घाडीगावकर (वय २२ रा. विरार, मुंबई ) हा संशयास्पदरित्या फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, चोरीच्या उद्देशाने तो फिरत असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीअंती आपल्यासोबत आनखीन काही साथीदार असल्याचे त्याने सांगितले. बसस्थानकाच्या मागील बाजूच्या घरात दत्ताराम अंकुश जाधव (वय २०) हा राहत असून त्याच्या घरात चोरीप्रकरणातील मयुर लवू लाड (वय २३, रा. हळवल, परबवाडी) हा असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तत्काळ मयुर याला ताब्यात घेतले. तसेच चोरीप्रकरणातील आरोपी असल्याचे माहित असूनही मयुर याला आसरा दिल्याप्रकरणी दत्ताराम जाधव यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघा संशयीत आरोपींनी मंगळसूत्र चोरीची कबुली दिली आहे. पोलिसांनी एक मंगळसूत्र हस्तगत केले असून दुसरे मंगळसूत्र हस्तगत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
तर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या तरूणाचा शोध घेण्यात येत आहे. ताब्यात घेतलेल्या तिघा संशयितांना अटक करून गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (वार्ताहर)