राज्याच्या सीमेवरील गावाचे तीन-तेरा

By admin | Published: June 30, 2016 11:40 PM2016-06-30T23:40:19+5:302016-06-30T23:40:34+5:30

गड-किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर : प्रशासनासह पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष; सडा गावाची उपेक्षा कायम

Three-thirteen of the village on the border of the state | राज्याच्या सीमेवरील गावाचे तीन-तेरा

राज्याच्या सीमेवरील गावाचे तीन-तेरा

Next

वैभव साळकर -- दोडामार्ग  इतिहासाची साक्ष देत मांगेलीच्या सीमेवर उभा असलेला ‘‘सडा’’ गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावादात अडकला आहे. मूळ कर्नाटक राज्यात जरी हा गाव असला तरी विविध कारणांमुळे या गावचे नाते महाराष्ट्राशी जोडले गेले आहे. कर्नाटक सरकारच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या दुर्लक्षामुळे सडावासीय विकासापासून वंचीत आहेत. शिक्षण आरोग्य व दळणवळणाच्या प्राथमिक सुविधा या गावापासून कोसो दूरच आहेत. साधारणत: पाचशे वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष देत या ठिकाणी उभ्या असलेल्या गड किल्ल्याच्या संवर्धनाकडेही पुरातत्व विभाग आणि पर्यायाने केंद्र शासनानेही दुर्लक्ष केल्याने ते ढासळत चालले असून भविष्यात नामशेष होण्याची भिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सीमेवर सडा गाव वसला आहे. चहूबाजूंनी घनदाट जंगल, गावात जायला मातीचा कच्चा रस्ता, शिक्षणाच्या सोयीचा अभाव, आरोग्याच्यादृष्टीने एखादा दवाखाना तर फारच दूर अशी अत्यंत गैरसोयींनी आणि सोयीसुविधांचा अभाव असलेला गाव म्हणून सडा गावचे वर्णन केल्यास ते वावगे ठरणार नाही. जसे या गावची ओळख मागासलेपण ही आहे याहीपेक्षा या गावाला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. गावच्या परिसरात ठिकठिकाणी त्याचे दाखले सापडतात. गावात एका डोंगराच्या कड्यावर उंच भागात गड आणि चिरेबंदी राजवाडा आहे. शिवाय आजूबाजूला शत्रूपासून रक्षण करण्याकरिता टेहळणी करण्यासाठी बांधलेले बुरूज तर आजही पाहावयाच मिळतात. या किल्ल्यावर व राजवाड्यावर लोखंडी तोफ आजही जशाच तशी असून ग्रामस्थ त्याची पूजा करतात.
गावात एकूण साठ विहिरी आहेत. गावच्या मधोमध असलेली विहिर वर्षाचे बाराही महिने गावकऱ्यांची तहान भागवते. एका बाजुला भुयारी मार्ग असून तो कुठे याचे अजूनही गुपीत कायम आहे. या गावच्या कोपऱ्या कोपऱ्यात इतिहास ठासून भरला आहे. ठिकठिकाणी अनेक पुरातन वास्तू आहेत. ज्या हा इतिहास उलघडण्यासाठी खुणावत आहेत. परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमा वादामुळे इतिहासाची पाने उलघडण्याबाबत संशोधन झालेले नाही. पुरानत्व विभागही याकडे आजपर्यंत तरी कानाडोळा करून आहेत. या गावचा इतिहास फारचा कोणास ठाऊक नाही. मात्र जाणकार व्यक्तींच्या सांगण्यानुसार कदंब राजवटीत विजापूरच्या आदीलशाहीने गोव्यातील कदंब राजवटीवर आक्रमण केले होते. त्यावेळी देसाई सरदार संरक्षणासाठी उंच अशा सह्याद्री डोंगर रांगाच्या माथ्यावर आला आणि त्याठिकाणी गाव वसवला होता, असे सांगितले जाते. मात्र तरी परिपूर्ण इतिहास कोणालाच माहित नाही.
गावात एकाच पाषाणी दगडात साकारलेले राई पांडुरंग रखुमाई देवाचे मंदिर आहे. जे इ. स. १७१२ मध्ये स्थापन केल्याचा पुरावा याठिकाणी आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे हा गाव इतिहासाचा साक्षीदार असताना सुद्धा विकासापासून वंचित आहे. मांगेलीपासून अवघ्या एक किलोमीटरवर सडा वसला आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी या गावचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. जेमतेम पन्नास घरे आहेत. मराठी आणि कोकणीही बोली भाषा या ठिकाणी बोलली जाते. जरी कर्नाटक राज्यात गाव वसले तरी मांगेलीमार्गे साटेली- भेडशीचा बाजारच त्यांना अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे बाजारासाठी हे लोक साटेली भेडशीत येतात.
शिक्षणाची गावात सोय नसल्याने मांगेलीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी साटेली भेडशी किंवा दोडामार्गच्याठिकाणी विद्यार्थी येतात. रोजगारासाठी बहुतांशी तरूण गोव्यात काम धंद्यासाठी जातात. पुरातत्व विभागले तर पूर्णत: डोळेझाक केल्याने इथले किल्ले, राजवाडा आणि बुरूज ढासळीत चालले आहेत. भविष्यात ही परिस्थिती अशीच राहील्यास इतिहासाची हे साक्षीदार नामशेष होण्याची भिती आहे.


पावसाळ्यानंतर सड्याच्या पठारावरही सौंदर्य पहावयास मिळेल
सडा जसा इतिहासाचा साक्षीदार आहे. तसाच नैसर्गिक साधन संपत्तीनेही भरलेला आहे. इथले किल्ले, राजवाडे, गावात असलेल्या विहिरी, विवरे आदींचा अभ्यास व त्यावर संशोधन झाल्यास पर्यटनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील कासच्या पठारावर जसे सौंदर्य पाहायला मिळते अगदी तसेच नैसर्गिक सौंदर्य व विविध रंगबेरंगी फुलांचा महोत्सव पावसाळ्यानंतर सड्याच्या पठारावरही पहावयास मिळतो.

Web Title: Three-thirteen of the village on the border of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.