तीन महिलांमध्ये ‘काँटे की टक्कर’
By admin | Published: November 17, 2016 09:54 PM2016-11-17T21:54:00+5:302016-11-17T21:54:00+5:30
देवगड-जामसंडे नगरपंचायत : प्रभाग नऊमध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती, देवगड सरपंचांची प्रतिष्ठा पणाला
देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये तिरंगी लढत होणार आहे. या लढतीमध्ये काँग्रेसच्या प्रणाली माने, राष्ट्रवादीच्या पूनम मुणगेकर व शिवसेनेच्या श्रीया कदम या दिग्गजांमध्ये ‘काँटे की टक्कर’ होणार आहे.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराचा वेग वाढतच चालला असून प्रभाग क्रमांक ९ मध्ये नागरिकांचे मागासवर्गीय महिला आरक्षण असून या प्रभागातील तिन्ही उमेदवार घरोघरी प्रचार करत आहेत. या प्रभागामध्ये देवगड-वरची बाजारपेठ, जगतापवाडी, कदमवाडी, आनंदवाडी हा भाग येत आहे. प्रभागात एकूण ५४० मतदार असून यामध्ये २५२ पुरुष, तर २८८ महिला मतदार आहेत.
पुरुषांपेक्षा या ठिकाणी महिला मतदार जास्त असल्याने महिलांच्याच हाती या तीनही महिलांचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसच्या प्रणाली माने या देवगड पंचायत समितीच्या सदस्या होत्या. या कालावधीत त्यांनी काही काळ उपसभापती म्हणूनही काम केलेले आहे. यामुळे त्यांनी आपल्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत माने या पोहोचल्या असून प्रचारामध्येही त्यांनी आघाडी घेतली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या या प्रभागातील उमेदवार पूनम मुणगेकर या मावळत्या देवगड ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या. त्यांनीही आपल्या सरपंचपदाच्या काळात देवगड भागामध्ये विकासकामे केली आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे नंदूशेठ घाटे यांचाही या प्रभागात प्रभाव असल्याने याचा फायदा मुणगेकर यांना होणार आहे. प्रणाली माने या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती देवगड पंचायत समितीची निवडणूक लढवून सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याचा राग राष्ट्रवादीचे नेते घाटे यांना असल्याने प्रणाली माने यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद पूनम मुणगेकर यांच्या बाजूने उभी केली आहे. यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील ही लढत अतिशय चुरशीची होणार आहे.
या प्रभागातील तिसऱ्या महिला उमेदवार शिवसेनेच्या श्रीया कदम यांचाही प्रभागामध्ये चांगला प्रमाणात जनसंपर्क असल्याने त्यांच्याही बाजूने मतदार आहेत. या ठिकाणची लढत ही अतिशय महत्त्वाची लढत आहे. या तीनही महिलांमध्ये होणारी ही लढत प्रतिष्ठेची व अस्तित्वाची ठरणार आहे. काँग्रेसच्या प्रणाली माने यांनी येथील महिला बचतगटांना सहकार्य करणे, त्यांचे सक्षमीकरण करणे आदी उपक्रमांतून उपसभापतिपदाच्या काळामध्ये मोठे योगदान दिले आहे. यामुळे बऱ्याचशा प्रमाणात प्रणाली माने यांच्या बाजूने या प्रभागातील मतदारांची बाजू भक्कम आहे. माजी उपसभापती व माजी सरपंच असलेल्या या दोन उमेदवारांमध्ये होणारी ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.
बाजारपेठेत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा दुकाने असल्यामुळे मोठी वाहने बाजारपेठेतून जाताना कोंडी निर्माण होते. त्यामुळे या रस्त्याचेही रुंदीकरण होणे महत्त्वाचे आहे. या प्रभागात मासळी लिलाव होत असलेला चांभारभाटी हा भाग येतो. लिलाव सेंटर असल्यामुळे या ठिकाणी सकाळी व सायंकाळी नेहमी मासळीची लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, येथे सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. याठिकाणी सुलभ शौचालय असणे महत्त्वाचे आहे. तसेच मच्छिमारांनाही आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने मच्छिमार बांधवांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होत आहे. (प्र्रतिनिधी)
प्रभागात सांडपाण्याची मोठी समस्या
या प्रभागात येणाऱ्या बाजारपेठांमध्ये पाणी व सांडपाणी या समस्या गंभीर आहेत. नळयोजनेची पाईपलाईन सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारातूनच जात आहे. ही पाईपलाईन काढावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. बाजारपेठेत नागरिकांना सोडण्यात येणारे पाणी हे नियोजित वेळेत सोडत नाहीत. पाणी सोडण्याची वेळ ही निश्चित नसल्यामुळे येथील नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीही जीर्ण झाल्या असून त्या फुटून त्यामधून गटारातील सांडपाणी गेल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.