घरफोडीप्रकरणी तिघा युवकांना अटक
By admin | Published: March 30, 2015 12:07 AM2015-03-30T00:07:19+5:302015-03-30T00:11:32+5:30
कणकवलीत कारवाई : अटकेतील सर्व उच्चशिक्षित
कणकवली : घरफोडी प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून शहरातीलच तिघा युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. अमित हेमंत वाळके (वय २२, तेलीआळी), अक्षय विनय बेळणेकर (२२) आणि अभिजित अनिल मांजरेकर (२१, बाजारपेठ) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. तिघांनाही २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अटक केलेले तीनही युवक उच्चशिक्षित आहेत. यामुळे शहरात गेल्या तीन महिन्यांत झालेल्या आठ घरफोडीच्या सत्राचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी मध्यरात्री कणकवली पोलिसांनी ही कारवाई केली. यातील अमित वाळके आणि अक्षय बेळणेकर या दोघांना घरातून तर अभिजित मांजरेकर याला हॉटेल हॉर्नबिलनजीक ताब्यात घेण्यात आले. १९ जानेवारी रोजी कलमठ परिसरात ग्रामपंचायतीसह अकरा ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. यात २१ हजार रोख रकमेसह दागिने चोरीस गेले होते. (पान १० वर)
या घरफोडीप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांच्यासह हवालदार शेखर सावंत, उत्तम पवार, पोलीस नाईक पी. डी. पांढरे, सतीश अलदर, बुचडे, कॉन्स्टेबल सय्यद, करे आदींनी ही कारवाई केली. रविवारी पहाटे ४.५० वाजता ही कारवाई पूर्ण झाली. अटकेतील अमित वाळके आणि अभिजित मांजरेकर हे वर्गमित्र आहेत. वाळके हा बी.एस्सी. शिक्षण घेत होता. मांजरेकर हा एलएल.बी.च्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. तर बेळणेकर हा इंजिनिअरींग ड्रॉपआऊट आहे. शहरातील इतर घरफोड्यांमध्ये या युवकांच्या सहभागाची शक्यता, घरफोड्यांसंदर्भातील पुरावे आदीचा तपास सुरू असून, अधिक माहिती लवकरच उघड होईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चौकट
आॅपरेशन कॅसिनो
शहरात वारंवार होणाऱ्या घरफोड्यांनी त्रस्त पोलिसांनी यात सहभागी असणाऱ्यांना पकडण्यासाठी ‘आॅपरेशन कॅसिनो’ नावे मोहीमच राबवली. पकडण्यात आलेल्या युवकांनी आपल्याला टोपणनावे ठेवली होती. ‘रॉनी १’, ‘रॉनी २’ आणि ‘रॉनी ३’ अशी नावे गुप्त संभाषणासाठी धारण करण्यात आली होती.
दोन महिने ‘वॉच’
सातत्याने घडणाऱ्या घरफोड्यांमागे स्थानिकांचा सहभाग असावा, असा पोलिसांचा दाट संशय होता. त्यादृष्टीने लक्ष केंद्रीत करण्यात आले. गोवा येथील कॅसिनोत जाणाऱ्या आणि दारूपार्ट्यांवर पैसे उधळणाऱ्या शहरातील युवकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले. या दिशेने गेले तीन महिने ‘वॉच’ ठेवण्यात आला होता. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संशयित म्हणून युवकांना अटक केली.