समाजिक कार्यातून प्रांताधिकाऱ्यांनी दिला मायेचा हात, 150 कुटुंबांना धान्यवाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:31 PM2021-06-11T22:31:04+5:302021-06-11T22:31:27+5:30
दिडशे कुटूंबाना धान्य वाटप : भारावलेल्या खासदारांनीही भेट देऊन केले कौतुक
सावंतवाडी : अधिकारी हाही माणूसच असतो तो जरी कायद्याचे काम करत असला तरी सामान्य माणसाचा दुष्मन नसतो अनेक अधिकाऱ्यांमध्ये मायेचा ओलावा नेहमीच जागृत असतो त्यामुळेच अधिकारी असूनही त्याच्यातील समाजिक कार्यकर्ता हा नेहमी जागा होत असल्याचे मूर्तिमंत उदाहरण सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्यात दिसून आले. कोरोना काळात गोरगरिब जनतेसाठी त्यांनी स्वता पुढाकार घेउन शंभर ते दिडशे जणांना धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला.
खांडेकर यांना त्यांच्या कार्यालयानेही मदतीचा हात पुढे करत ते स्वत: यामध्ये सहभागी झाले. त्यांच्या उपक्रमाचे खासदार विनायक राउत यांनी भेट देउन स्वागतच केले नाही तर आपल्याकडून फुल ना फुलाची पाखळी म्हणून मदतही केली. गेली चार वर्षे सुशांत खांडेकर हे सावंतवाडीचे प्रांताधिकारी म्हणून कारभार हाकत आहेत. या काळात त्यांनी पडद्यामागून गोरगरिब जनते साठी आपल्या पदाचा वापर केलाच नाही तर त्यांना प्रत्यक्षात जाऊन मदतही केली. अधिकारी माणूसच असतो पण तो खुर्चीवर बसला की कायद्याच्या कचाट्यात काम करत असतो. खुर्चीच्या बाहेर आल्यानंतर त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता हा जागा होत असल्याचे दिसून आले.
सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी आपल्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मित्रमंडळीला केलेल्या आवाहनातून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या गृहोपयोगी वस्तू तालुक्यातील दिडशे कुटुंबाना वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. पहिल्या लॉकडाऊनमध्ये समाजातील गरजू लोकांना सर्वतोपरी मदतीचे हात उभे राहिले. मात्र, दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये अशा प्रकारची मदत मिळाली नाही, त्यामुळे खरोखरच गरजू कुटुंब आर्थिक विवंचनेत जगत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच या कुटूंबाना आपली मदत झाली पाहिजे ही भावना लक्षात घेउन खांडेकर यांनी सावंतवाडी परिसरातील शंभर-दिडशे कुटुंबांना पहिल्या टप्यात धान्य वाटप करण्याचे ठरवले.
खांडेकर यांच्या उपक्रमाची माहिती खासदार विनायक राउत यांना समजल्यानंतर त्यानीही प्रांताधिकारी यांचे कौतुक करण्यासाठी सावंतवाडी गाठली. एक अधिकारी असे करू शकतो हे बघून खासदारही भारावून गेलेच त्या शिवाय त्यांनीही या उपक्रमाला आपला हातभार लागावा म्हणून फुल ना फुलाची पाखळी म्हणून मदत दिली. तसेच, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार राजाराम म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते बाबू कुडतरकर व तलाठी संजय निबाळकर यांचे कौतुक केले. यावेळी रूची राउत, तालुकाप्रमुख रूपेश राउळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुडलिक दळवी, बाबू कुडतरकर,जिल्हा परीषद सदस्य राजन मुळीक आदि उपस्थित होते.