चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Published: June 23, 2015 12:29 AM2015-06-23T00:29:29+5:302015-06-23T00:29:29+5:30

सोनाळीत घरफोडी : सावंतवाडीत सुवर्णकारांची दुकाने फोडली

Thunderbolt | चोरट्यांचा धुमाकूळ

चोरट्यांचा धुमाकूळ

Next

वैभववाडी : सोनाळी वाणीवाडी येथील संतोष राजाराम शिरावडेकर यांचे भर दिवसा घर फोडून रोख रकमेसह सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. त्यामध्ये ३२ हजारांची रोकड आणि साडेपाच तोळे सोन्याचा समावेश आहे. दुपारी १ ते २ या तासाभराच्या कालावधीत चोरीची घटना घडली. दरम्यान, सावंतवाडीतील दोन सुवर्णकारांची दुकानेही चोरट्यांनी फोडली. यामध्ये सुवर्णकारांची दोन किलो चांदी लंपास केली आहे.
संतोष शिरावडेकर यांची पत्नी घरच्या दरवाजाला कुलूप लावून कपड्यांना शिलाई करण्यासाठी शेजारी गेली होती.
दुपारी दोनच्या सुमारास घरात आल्या तेव्हा पाठीमागचे दोन्ही दरवाजे उघडे आढळल्याने तिने फोन करून वैभववाडीतून संतोषला बोलावून घेऊन घरात पाहिले असता देवखोलीसह लगतच्या खोलीतील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. देवखोलीच्या बाजूच्या खोलीतील पत्र्याच्या दोन्ही पेट्या फोडून रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरट्याने मागचा दरवाजा धक्का मारून उघडल्यानंतर कटावणीने मधल्या दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. संतोषच्या वडिलांनी बैल (पान ५वर)

(पान १वरून) विकून मिळालेले आणि घरखर्चाचे असे ३२ हजार रुपये पेटीत ठेवले होते. ते गणेशमूर्तींना रंगकाम करून विक्रीचा व्यवसाय करतात. हे पैसे घेऊन संतोष गुरुवारी गणेशमूर्ती खरेदीसाठी कोल्हापूरला जाणार होता, तर त्याच्या आईची सोन्याची माळ, कुडी, वडिलांच्या दोन अंगठ्या असे सुमारे साडेपाच तोळे सोने चोरट्याने लंपास केल्याचे कळताच संतोषच्या आई-वडिलांना धक्का बसला.
आजूबाजूस घरे असताना रस्त्यालगतच्या घरात भरदिवसा चोरी झाल्याने तेथील लोक चांगलेच धास्तावले आहेत. गेल्या पाच दिवसांतील दिवसा घरफोडीची, तर दहा दिवसांतील मोठ्या चोरीची तिसरी घटना आहे. (प्रतिनिधी)

सावंतवाडीत खळबळ
सावंतवाडी शहरात चोरीचे सत्र सुरूच असून, रविवारी मध्यरात्री शहरातील उभाबाजार येथील दोन सुवर्णकारांची दुकाने फोडली. त्यातील बाळकृष्ण अरविंद मठकर (सावंतवाडी) यांच्या दुकानातून दोन किलो चांदीचे दागिने लंपास केले. तर त्यांच्या शेजारी असलेल्या मनीष पावस्कर यांचे दुकानही फोडण्याचा प्रयत्न केला, पण चोरांना यश आले नाही. या घटनेने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Thunderbolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.