रेल्वेत जागेसाठी तुंबळ हाणामारी
By admin | Published: September 22, 2015 09:37 PM2015-09-22T21:37:55+5:302015-09-22T23:53:03+5:30
खेड रेल्वेस्थानकातील प्रकार : प्रवासी महिलेचा पाय मोडला; नातेवाईक संतप्त
खेड : खेड रेल्वे स्थानकात मंगळवारी सायंकाळी आलेल्या मांडवी एक्स्प्रेसमध्ये अक्षरश: राडा झाला. रेल्वेतील प्रवासी आणि स्थानकातील प्रवाशांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. मुलगा रेल्वेत चढला; परंतु आई-वडिलांना गाडीत चढू न दिल्याने प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली.
या गडबडीत मुलाच्या आईचा पाय मोडल्याने तिला खेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. स्थानकात मोजक्याच असलेल्या पोलिसांची या प्रकारामुळे चांगलीच भंबेरी उडाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून जादा कुमक मागविल्याने मोठा अनर्थ टळला.
खेड तालुक्यातील एक कुटुंब खेड रेल्वेस्थानकात मुंबईला जाण्यासाठी मांडवीच्या प्रतीक्षेत होते. रोज ४.२0 वाजता येणारी मांडवी एक्स्प्रेस मंगळवारी सायंकाळी तब्बल ५.२0 वाजता आली.
यावेळी स्थानकामध्ये मोठी गर्दी उसळली होती. ही गाडी आधीपासूनच प्रवाशांनी खचाखच भरून आली होती. अशातच खेड स्थानकात मोठ्या संख्येने उपस्थित असलेले प्रवासी गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, आतील प्रवाशांनी दरवाजे आतून बंद केल्याने स्थानकातील प्रवाशांनी दरवाजावर हाताने मारण्यास सुरुवात केली. स्थानकात मोजकेच पोलीस असल्याने ते काहीही करू शकत नव्हते. अखेर एक दरवाजा उघडला गेला. याचा फायदा घेत एक मुलगा या दरवाजातून आत शिरला. पाठोपाठ त्याची आई चढत असतानाच तिला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे या महिलेच्या नातेवाइकांची आतील प्रवाशांबरोबर (पान १ वरून) जोरदार जुंपली. मुलगा आत चढल्याबरोबर दरवाजा आतून बंद केला. मात्र, मुलाचे सर्व नातेवाईक बाहेर होते. आमच्या मुलाला तरी बाहेर पाठवा अन्यथा आम्हाला आत घ्या, असा आक्रोश यावेळी नातेवाइकांनी केला. मात्र, आतील प्रवासी ऐकायला तयार नव्हते. अखेर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असताना गर्दीत मुलाच्या आईचा पाय मोडला.
यावेळी मात्र स्थानकातील इतर प्रवाशांनीही आक्रमकता दाखविली. यावेळी आतील प्रवाशांना मारहाण केली. हाणामारीनंतर रेल्वे ताबडतोब सुटल्याने पोलिसांनाही कारवाई करता आली नाही. मुलाच्या आईला घेऊन त्यांचे नातेवाईक खेड येथील खासगी दवाखान्यात गेले. बुधवारी कामावर जाण्यासाठी निघालेल्या या कुटुंबावर खेडमध्येच राहण्याची वेळ आली.
राज्य राखीव पोलीस दलास पाचारण
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानकावरील पोलिसांनी जादा कुमक मागविली. तसेच राज्य राखीव पोलीस दल आणि काही लष्करी जवानही तातडीने रेल्वेस्थानकात तैनात करण्यात आले.
मांडवी एक्स्प्रेसमध्ये जागा न मिळाल्याने मुंबईला जाणारे अनेक प्रवासी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान येणाऱ्या वेरावळ गाडीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, ही गाडीही भरून आल्याने प्रवाशांना गाडीत चढताना नाकीनऊ आले होते.